दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२३ । इर्शाळवाडी । खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळल्याची घटना २० जुलै रोजी घडली. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी दोन महिलांचे मृतहेद एनडीआरएफच्या हाती लागले. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०५ जण अजूनही बेपत्ता आहेत. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इर्शाळवाडीतील दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत तुम्हा सगळ्याचं पुनर्वसन होत नाही, तुमचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. तसेच यामध्ये कुठेही राजकरण येऊ देणार नाही, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी यावेळी ग्रामस्थांना दिलं आहे दिलं.
इर्शाळवाडीतील दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी अनेक आदिवासी जमाती अशा पद्धतीचं जीवन जगत आहेत. त्यामुळे आता आदिवासी जमातीला प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही अशा पद्धतीच्या वस्त्या आहेत त्यांच पुनर्वसन व्हायला हवं, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सरकार आले किंवा गेले तरी या योजनेला स्थगिती देऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
मी सरकारकडे जायला तयार-
सध्याचं क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी सरकारकडे जायला तयार आहे, यामध्ये मला कोणताही कमीपणा येणार नाही. मी सरकारकडे जनेतेच्या दृष्टीकोनातून पाहतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
औषध फवारणी
इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.
अशी असेल व्यवस्था
मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.