मराठवाडीच्या काठावर जागता पहारा


 

स्थैर्य, सातारा, दि. ०९ : मराठवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसणार्‍या धो-धो पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून घरांच्या दिशेने सरकणारे धरणाचे पाणी आणि दुसरीकडे चिल्या-पिल्यांच्या काळजीने डोळ्यात दाटलेले काळजीचं आभाळ अशा बिकट परिस्थितीत मराठवाडी धरणांतर्गत उमरकांचन येथील खालच्या आवाडातील धरणग्रस्त कुटुंबांनी कालची रात्र जलाशयावर नजर ठेवत अक्षरशः जागूनच काढली. रखडलेल्या पुनर्वसनामुळे संबंधित धरणग्रस्त कुटुंबांनी ‘प्रसंगी पाण्यात बुडून मरू, परंतु घर सोडणार नाही’ अशी भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठाच पेच उभा राहिला आहे.

उमरकांचन येथील खालचे आवाडातील धरणग्रस्तांचे सांगली जिल्ह्यातील माहुली येथील गावठाणात पुनर्वसनाचे प्रयोजन असले तरी गेल्या 22 वर्षात त्यांच्या पुनर्वसनाचा गुंता पूर्ण सुटलेला नाही. सध्या मराठवाडी धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळी वेगाने वाढत आहे. यावर्षी धरणात 649 मीटरपर्यंत पाणीसाठा होणार असल्याने खालच्या आवाडातील घरे पाण्यात जाणार आहेत. धरणग्रस्तांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पाटबंधारे विभागाने गावाजवळ पर्यायी निवारा शेडची व्यवस्थाही अजून केलेली नाही. कालपासून जलाशयातील पाणी वेगाने घरांकडे सरकू लागल्याने धरणग्रस्त काळजीत असून काल रात्रभर डोळ्याला-डोळा लागला नाही. आख्खी रात्र जागून काढल्याचे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे संबधित धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांचा शासनस्तरावर पाठपुरावा करत असून सध्याच्या बिकट स्थितीत धरणग्रस्तांची सर्व भिस्त त्यांच्यावरच आहे.

विसर्गापेक्षा पंधरापट जास्त आवक

मराठवाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून धरणांतर्गत मेंढ येथील मंदिरे व लगतच्या इमारती पाण्याने चोहोबाजूंनी वेढल्या आहेत. उमरकांचन-खालचे आवाडातील पाणी पुरवठ्याच्या विहिरी, स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. विसर्गापेक्षा पाण्याची आवक पंधरा पटीने अधिक असल्याने ताळमेळ जुळताना दिसत नाही. धरणातील आजचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे : पाणी पातळी 640 मीटर, एकूण पाणीसाठा 22.86 दशलक्ष घनमीटर, जीवंत पाणीसाठा 22.63 दशलक्ष घनमीटर, टक्केवारी -58 टक्के, कालचा पाऊस 61 मिलीमीटर, एकूण पाऊस 646 मिलीमीटर. पाणी आवक- 2300 घनफूट प्रतिसेकंद, सांडवा विसर्ग शून्य घनफूट प्रतिसेकंद, सिंचनद्वारे विसर्ग 150 घनफूट प्रती सेकंद.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!