विडणी: ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा महाघोटाळा – चौफेर चौकशी सुरू

श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखालील काळातील विडणी ग्रामपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून प्रशासनाकडून खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे.

स्थैर्य, विडणी, दि. २६ जुलै : फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतीत २०१६-१७ ते २०२२-२३ या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाची सत्ता असताना हा मोठा घोटाळा घडल्याचे समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता

स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाच्या अहवालानुसार, विडणी ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाचा निधी, ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी तसेच विकासकामांच्या नावाखाली १ कोटी २० लाखांहून अधिक रुपयांची अनियमितता झाली आहे. यामध्ये ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे देयक नियमानुसार क्रॉस चेकने न देता स्वतःच्या नावे रोखीने (सेल्फ चेक) काढून अपहार केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.

विविध निधीत मोठा गैरव्यवहार

अहवालानुसार सन २०१६-१७ ते २०२२-२३ या वर्षांमध्ये कर वसुलीची लाखो रुपयांची रक्कम ग्रामनिधीत जमा न करता हडप करणे, नियमबाह्यपणे निधी वर्ग करणे, निविदा न मागवता कामे करणे आणि जीएसटी, टीडीएस, रॉयल्टी कपात न करता शासनाचा महसूल बुडवणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. एका पाठोपाठ एक गैरव्यवहार बाहेर येत असल्याने ‘अजून किती घोटाळे झाले असतील?’ अशी तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

खातेनिहाय चौकशीचे आदेश

याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांच्या दालनात खातेनिहाय चौकशी प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी धनाजी चव्हाण यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत.

Back to top button
Don`t copy text!