पौष्टिक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवावेत – मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ एप्रिल २०२३ । मुंबई । संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दैनंदिन आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पोहोचविण्यासाठी शासकीय विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केली. राज्य शासनाच्या वतीने त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात 1 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक आज मुख्य सचिव यांच्या कार्यालयात झाली. यावेळी विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी घेतला. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, संचालक (कृषी) विकास पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

यावेळी मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव म्हणाले की, शहरातील लहान हॉटेल्स ते अगदी पंचतारांकित हॉटेल्समध्ये पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ ठेवले जावेत, या अनुषंगाने पर्यटन विभाग, ग्रामविकास विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांनी सहकार्याने कार्यवाही करावी. त्याचबरोबर अंगणवाडी, शाळा याठिकाणी आठवड्यातून एकदा जेवणात पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेला आहार देता येईल का, याबाबतही विचार व्हावा. प्रत्येक जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचे अनुकरण राज्याच्या विविध भागात व्हावे. पौष्टिक तृणधान्याविषयी अधिकाधिक जनजागृती करुन त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, लोकांच्या आहारातील वापर वाढविणे, या आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसिद्धी विषयक उपक्रम राबविण्याविषयक विविध विभागांनी त्यांना ठरवून दिलेली कामे करण्याच्या सूचनाही मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी दिल्या.

यावेळी कृषीसह विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती मुख्य सचिव यांना दिली.


Back to top button
Don`t copy text!