
स्थैर्य, सातारा, दि. 23 : वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाल्याप्रकरणी पिंपरी (ता. कोरेगाव) येथील दोघांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
किशोर वसंत सोनवले (वय 29), राजेश वसंत सोनवले (वय 36) व 1 अल्पवयीन (सर्व रा. पिंपरी, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 23) पिंपरी (ता. कोरेगाव) येथे दोन व्यक्ती वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार तेथील व्यक्तींची परिक्षेत्र वन अधिकारी कोरेगाव व फिरते पथक सातारा यांनी संयुक्तपणे चौकशी केली असता त्या व्यक्तींनी दि. 21 जून रोजी वनक्षेत्रातून घोरपड या वन्यप्राण्यास पकडून त्याची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाल्याचे आढळून आले.
याप्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी, कुर्हाड व इतर साहित्य असा एकूण अंदाजे 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घोरपड या वन्यप्राण्यास शासनाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 19 72 चे अनुसूची 1 भाग- 2 मध्ये स्थान देऊन व्यापक संरक्षण दिलेले आहे. मांस खाण्याच्या लोभापाई वन्यप्राणी शिकार करण्याची गैरप्रवृत्ती वाढत आहे. वन्यप्राणी शिकारीच्या गुन्ह्यासाठी वन कायद्यामध्ये 3 ते 7 वर्षांच्या कारावासासह आर्थिक दंडाची सुद्धा तरतूद आहे. वन गुन्ह्याबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असळ्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागकडून करण्यात आले आहे.
सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक सातारा भारतसिंह हाडा व सहा. वनसंरक्षक एस. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र कोरेगाव व फिरते पथक सातारा यांच्याकडील स्टाफने ही कारवाई संयुक्तपणे पार पाडली.
या कारवाईमध्ये कोरेगावचे वनक्षेत्रापाल आर. एस. आटोळे व वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा एस. एन. डोबाळे, शिडतुरे, गजानन भोसले, वनरक्षक कोळेकर, दीपक गायकवाड, विजय भोसले, राम शेळके, विजय नरळे व पो. कॉ. सुहास पवार व पो. हवा. राजेश वीरकर यांनी सहभाग घेतला.