
थेट WhatsApp वर मिळवा
सामाईक ७/१२ जमिनीच्या व्यवहारातील वाद टाळण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रीसाठी ‘क’ प्रत किंवा संमतीपत्राशिवाय दस्त नोंदणी होणार नाही.
स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑक्टोबर : सामाईक नावे असलेल्या ७/१२ जमिनीच्या व्यवहारांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या नव्या निर्णयानुसार, सामाईक जमिनीचा हिस्सा विकताना मोजणीची ‘क’ प्रत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांच्या संमतीपत्राची अट रद्द करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
‘क’ प्रत जोडल्यास संमतीपत्राची गरज नाही
नवीन नियमांनुसार, सामाईक ७/१२ वरील जमिनीचा हिस्सा विकताना भूमीअभिलेख विभागाच्या मोजणीची ‘क’ प्रत दस्तासोबत जोडणे आता फायदेशीर ठरणार आहे. ही प्रत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांच्या लेखी संमतीशिवाय किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे. सामाईक जमिनींच्या विक्रीवेळी इतर हिस्सेदारांची परवानगी न घेतल्यामुळे वाढणारे वाद रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
दस्त नोंदणीसाठी कठोर अटी लागू
जर मोजणीची ‘क’ प्रत जोडली नसेल, तर मात्र इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र जोडणे पूर्वीप्रमाणेच अनिवार्य असणार आहे. या दोन्हीपैकी कोणतीही एक अट पूर्ण न केल्यास दुय्यम निबंधकांकडून संबंधित दस्तांची नोंदणी केली जाणार नाही. सर्व दुय्यम निबंधकांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.





