
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या फलटण सोसायटी मतदारसंघातील चिन्ह वाटप पूर्ण झाले आहे. समशेरसिंहांना हेलिकॉप्टर तर संजीवराजेंना शिट्टी चिन्ह मिळाले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या फलटण तालुका सोसायटी मतदारसंघासाठी निवडणूक चिन्हांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना हेलिकॉप्टर, तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.
श्रीमंत रामराजे विरुद्ध रणजितसिंह आमनेसामने
फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे या मतदारसंघातील लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे.
हेलिकॉप्टर आणि शिट्टीची चर्चा
साताऱ्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना हेलिकॉप्टर हे चिन्ह मिळाले असून, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाट्याला शिट्टी हे चिन्ह आले आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात आता हेलिकॉप्टर विरुद्ध शिट्टी अशी थेट आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळणार आहे.





