
थेट WhatsApp वर मिळवा
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी फलटण तालुका प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २३) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑक्टोबर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून फलटण तालुका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून प्रशासनाकडून शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मतदान केंद्र आणि उमेदवार रचना
पदवीधर निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण ८ आणि शिक्षक निवडणुकीसाठी एकूण ४ केंद्र उभारण्यात आली आहेत. ही सर्व केंद्रे मुधोजी हायस्कूल फलटण, जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर, जिल्हा परिषद शाळा निंबळक आणि वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव या चार प्रमुख ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारांनी कागदी मतपत्रिकेवर मराठी, इंग्रजी किंवा रोमन आकड्यामध्ये एकपासून पुढे निवडणूक आयोगाने पुरवलेल्या पेनने पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे आहे. पसंतीक्रम अक्षरामध्ये नमूद केल्यास मत बाद ठरवले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वेळापत्रक आणि मतदार संख्या
मतदानाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे. फलटण तालुक्यातून नोंदणीकृत पदवीधर मतदार ४९०० असून शिक्षक मतदार ९८६ आहेत. मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी mahaelection.gov.in या संकेतस्थळावर graduate किंवा teacher या पर्यायावर जाऊन सातारा जिल्हा, फलटण तालुका आणि आपले संपूर्ण नाव प्रविष्ट करून माहिती मिळवता येणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.





