• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘संकटमोचक’ : श्री.रविंद्र बेडकिहाळ

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
एप्रिल 22, 2023
in लेख, विशेष लेख

‘पत्रकारिता हेच माझे जीवन आहे’ असे समजून उमजून त्यासाठी ध्येयवादाने आयुष्य वेचणारे जे काही थोडेफार पत्रकार, संपादक आहेत त्यात आदरणीय श्री.रविंद्र बेडकिहाळ यांचे नाव नक्कीच अग्रभागी घ्यावे लागेल. आपल्या पेशाशी आपण किती एकरुप होऊन काम करतो यावर त्यातील यश अवलंबून असते आणि हे करणे तसे फारसे अवघडही नसते. मात्र याबाबतीत पत्रकारिता हे क्षेत्र थोडे वेगळे आहे; असे मला वाटते. कारण, यात काम करताना व्यवसाय म्हणून अथवा पेशा म्हणून काम करुन चालत नाही. पत्रकारिता हे एक ‘ध्येय’ मानून जोपासावे लागणारे व्रत आहे. याच पद्धतीने ज्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणकार्य व आपद्ग्रस्त पत्रकारांना मदत हे ‘ध्येय’ डोळ्यासमोर ठेवून आपली आजवरची संपूर्ण हयात खर्ची केली अशा आमच्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक व अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष, साप्ताहिक ‘लोकजागर’चे संस्थापक तथा लोकजागर परिवाराचे कुटूंबप्रमुख श्री.रविंद्र बेडकिहाळ यांचा आज दि.22 एप्रिल रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.

पत्रकारांसमोर पत्रकारितेतील आव्हानांबरोबरच स्वत:चे संरक्षण, आपद्प्रसंगी आर्थिक मदत, पेन्शन, अधिस्वीकृती, पत्रकार भवन, पत्रकार वसाहत, वृत्तपत्रांची शासन मान्यता, जाहिरात दरवाढ असे एक ना अनेक प्रश्‍न उभे असतात. हे प्रश्‍न सोडवायचे असतील तर पत्रकारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे असते. पत्रकार संघटना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे प्रश्‍न एकच आहेत. त्यामुळे सर्व प्रश्‍न सुटेपर्यंत सर्वांनी एकत्र हा लढा सुरु ठेवणे हिताचे असते. नेमक्या याच भूमिकेतून राज्यातील पत्रकारांसमोर व विशेषत: छोट्या वृत्तपत्रांच्या संपादकांसमोर कोणतेही संकट आले तरी त्यांचे ‘संकट मोचक’ म्हणून श्री.रविंद्र बेडकिहाळ सर्वप्रथम धावून येतात. पत्रकारांना नेहमीच सहाय्य करण्याची भूमिका पार पाडून विधायक कार्यात ते आघाडीवर असतात. हे त्यांच्या सलग 50 हून अधिक वर्षाच्या पत्रकारितेतील सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे.

श्री.रविंद्र बेडकिहाळ यांनी 1987 साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेची फलटणसारख्या लहान शहरातून सुरुवात केली. आपद्प्रसंगी पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना काही आर्थिक मदत तातडीने मिळावी हा या संस्था स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता आणि तो सार्थही ठरला. त्यानंतर श्री.रविंद्र बेडकिहाळ यांच्या संकल्पनेतून व या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वात प्रथम 1993 साली मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक प्रकल्पाचे काम बाळशास्त्रींच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे सुरु करण्यात आले. अनेकांचा विरोध व मोजक्यांची साथ अशा कठीण परिस्थितीत जे येतील त्यांना सोबत घेवून व जे विरोध करतील त्यांच्या शिवाय अशी ठाम भूमिका ठेवून श्री.बेडकिहाळ सरांनी जांभेकर स्मारकाचे काम पूर्ण केले. या स्मारक उभारणीचा इतिहास जर बारकाईने अभ्यासला तर त्यांची या कामातील चिकाटी थक्क करणारी अशीच आहे.

हे स्मारक कार्य सुरु असताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या उभारणीत जो प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता तो कधीही त्यांनी मागे पडून दिला नाही. पूर्ण वेळ पत्रकारिता करणार्‍या पत्रकाराची आर्थिक स्थिती नाजूक असते. अशात कोणा पत्रकाराला मारहाण तर कुठे वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड, बातमीदारी करीत असताना अचानक अपघात, मोठा आजार, शस्त्रक्रिया असे आघात जर त्या पत्रकारावर झाले तर त्याच्या संपूर्ण कुटूंबाची वाताहत होते. अशा परिस्थितीत त्या पत्रकाराला आर्थिक आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जमेल त्या पद्धतीने आजवर केले आहे. विशेष म्हणजे आजवर सुमारे तीनशेहून अधिक पत्रकारांना अशा स्वरुपाची मदत करुन देखील या मदतीची कोठेही प्रसिद्धी वा गाजावाजा करायचा नाही हा पहिल्यापासूनचा कटाक्ष त्यांनी पाळला आहे. हा सरांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. सरांच्या या कार्यातील अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे पत्रकारांना अशा प्रकारे आर्थिक सहाय्य करण्याचे कार्य राज्यात सर्वप्रथम सरांनीच सुरु केले. त्यांच्यानंतर शासन म्हणून असे काही तरी आपणही केले पाहिजे ही सुबुद्धी महाराष्ट्र शासनाला तब्बल 20 वर्षांनंतर सुचली; यातच बरेच काही आले.

याच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून श्री.बेडकिहाळ सरांनी मराठी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली. संस्था स्थापनेपासून आजवर राज्यातील विविध भागातील 300 हून अधिक होतकरु व कर्तृत्त्ववान संपादक, पत्रकारांचा यथोचित गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे त्यांच्या जन्मगावी देण्यात येणार्‍या या पुरस्काराने आज वृत्तपत्रसृष्टीत सन्मानाची व प्रतिष्ठेची समाजमान्यता मिळवली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यानंतर अनेक वर्षांनी राज्यातील काही संस्था व महाराष्ट्र शासन यांनी बाळशास्त्रींच्या नावे पुरस्कार देण्यास सुरुवात केली, यातून सरांच्या या कार्याचे महत्त्व व दूरदृष्टी स्पष्ट होत आहे.

पत्रकारितेत प्रतिष्ठा आहे पण आर्थिक स्थैर्य नाही. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना आपल्या निवृत्तीनंतरचा काळ अत्यंत हलाखीत घालवावा लागतो. अशा परिस्थितीत या ज्येेष्ठ पत्रकार, संपादकांना शासनाने निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी श्री.बेडकिहाळ सरांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या राज्यपातळीवरील संस्थांनी शासन दरबारी सलग 30 वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक सहाय्य म्हणून निवृत्ती वेतन द्यावे व या योजनेला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे अशीही आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यासाठी शासनातले अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांना पत्र, निवेदन, उपोषणाचे इशारे यासह पंतप्रधान कार्यालयाचे दरवाजेही ठोठावले. सरते शेवटी 30 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या या कार्यालाही यश मिळाले. शासनाने राज्यात ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ लागू केली. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू ज्येष्ठ पत्रकारांना मिळत आहे. इतकेच नाही तर तांत्रिक अडचणींमुळे अटी – शर्थी पूर्ण करता येत नसल्याने या योजनेपासून वंचित राहत असलेल्या पत्रकारांसाठी प्रशासकीय पातळीवर श्री.बेडकिहाळ सरांचा लढा आजही कायम सुरुच आहे.

राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी सन 1981 साली स्थापन झालेल्या व महाराष्ट्रात सहकारी तत्वावर कार्यक्षमरित्या सुरु असलेल्या वृत्तपत्र संपादकांच्या एकमेव अशा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थेचे श्री.बेडकिहाळ सर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुमारे 42 वर्षांचा इतिहास असणार्‍या या संस्थेमार्फत जिल्हा वृत्तपत्र व संपादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न श्री.बेडकिहाळ सर सातत्याने करीत आहेत. यामध्ये शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांचे कुटूंबिय यांना शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात धोरणात बदल घडवून आणून शासनमान्य वृत्तपत्रांच्या जाहिरातदरामध्ये वाढ करणे, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांच्या होणार्‍या पडताळणीमधील वृत्तपत्रांना मारक असलेल्या अटी रद्द होण्यासाठी श्री.रविंद्र बेडकिहाळ सर याही वयात राज्यातील तमाम वृत्तपत्र संपादक व मालकांचे नेतृत्त्व करीत आहेत.

याचे एक उदाहरण म्हणजे शासनाच्यावतीने सन 2018 साली राज्यातील वृत्तपत्रांच्या जाहिरात धोरणाच्या मसुद्यात अशाच काही जाचक अटींचा समावेश केला होता. हा मसुदा वाचल्यानंतर अनेक संपादकांनी तर ‘आपल्याला शासनाच्या यातील अटी पूर्ण करणे शक्य नसल्याने आपले वृत्तपत्र आपण बंदच करावे की काय?’ असा विचार सुरु केला होता. यावर राज्यातील विविध भागातील अनेक संपादकांचे सरांना फोन आले व या प्रश्‍नी आपण पुढाकार घेवून आपल्या सर्वांवरचे हे संकट दूर करावे असे साकडे घातले. सरांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या मार्फत या मुद्यातील विविध मुद्यांवर शासनाकडे हरकती तर नोंदवल्याच मात्र या हरकतीची नोंद घेवून शासनाने धोरणामध्ये तसे बदल घडवून आणावेत यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शासनाचे प्रस्तावित धोरण जर आहे अशा स्वरुपात लागू झाले तर छोटी वृत्तपत्रे की जी ग्रामीण भागातील घरोघरी पोचतात ही पूर्णपणे देशोधडीला लागतील, ही बाब श्री.बेडकिहाळ सरांनी श्रीमंत रामराजे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ सरांच्या विनंतीनुसार विधानभवनातील त्यांच्या दालनात माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकारी व राज्यातील प्रमुख पत्रकारांसमवेत बैठक आयोजित केली. या बैठकीचा परिणाम म्हणजे त्यानंतर या संदेश प्रसारण धोरणातील अनेक जाचक अटी शासनाकडून सुधारण्यात आल्या. सरांच्यामुळे छोट्या वृत्तपत्रांच्या अस्तित्वावर आलेले भले मोठे संकट टळले. म्हणूनच सरांना ‘संकट मोचक’ म्हणणे याठिकाणी सार्थ ठरेल.

श्री.बेडकिहाळ सरांनी तीन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या ‘प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे राज्य अधिस्वीकृती समिती’वर ही सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी या काळात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पत्रकार व संपादकांना अधिस्वीकृती पत्रिकेचा लाभ कसा देता येईल यासाठी परिश्रम घेतले. त्यासाठी अधिस्वीकृती पत्रिका देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचेही वारंवार सूचित केले. वृत्तपत्रांची अधिस्वीकृती पत्रिका देण्याची मर्यादा वाढवून त्याचा लाभ अधिकाधिक पत्रकारांना मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. फलटण सारख्या ग्रामीण भागातून दहा – दहा, वीस – वीस वर्षे वृत्तपत्र चालवणार्‍या, प्रतिनिधी म्हणून काम करणार्‍या संपादक, पत्रकारांना त्यांच्या हक्काची अधिस्वीकृती पत्रिका शासनाकडून मिळवून देण्याचे काम श्री.बेडकिहाळ सरांनी या समितीच्या सदस्यपदाच्या कार्यकाळात केले; हे आमच्या सारख्या स्थानिक पत्रकारांच्या कायम लक्षात राहण्यासारखेच आहे.

वर्तमानपत्राबाबतच्या आजच्या आर्थिक गणितांचा विचार केला तर एखादे वृत्तपत्र चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. वृत्तपत्राला अर्थार्जनाचे साधन म्हणून चालविले तरच ते चालविणे शक्य आहे. भांडवलशाही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीयासमोर छोट्या वृत्तपत्रांना नगण्य किंमत दिली जात आहे. अशा भीषण परिस्थितीतही पदरमोड करुन नफा – तोट्याकडे कानाडोळा करुन लोकजागृतीचा वसा घेवून 17 मार्च 1980 रोजी सुरु झालेले साप्ताहिक लोकजागर 44 वर्षे अव्याहतपणे श्री.बेडकिहाळ सर चालवत आहेत. सरांनी जर मनात आणले असते तर त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या मदतीवर आपले हे वृत्तपत्र सहजरित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व त्यातून भरघोस उत्पन्नाचे साधन म्हणून निर्माण केले असते. मात्र पत्रकारितेतील मूल्यांची जोपासना करुन आपले वृत्तपत्र लहान तर लहान पण ते कोणाच्याही ताटाखालचे मांजर होऊन द्यायचे नाही ही रोखठोक भूमिका त्यांनी ‘लोकजागर’च्या बाबतीत ठेवली. पत्रकारिता व वृत्तपत्रसृष्टीप्रती असणारी त्यांची निष्ठा यामध्ये प्रकर्षाने दिसून येते.

पत्रकारितेबरोबरच साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातही श्री.बेडकिहाळ सर कार्यरत असून शासनाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, भारती विद्यापीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद, महात्मा एज्युकेशन सोसायटी, श्रीराम बझार, लोकजागर प्रतिष्ठान अशा नामांकित संस्थांच्या माध्यमातून ते आपले समाजोपयोगी योगदान आजही देत आहेत.

संवाद कौशल्य, कमालीची सकारात्मकता, समोरचा माणूस आपल्यापेक्षा वयानी व अनुभवानी कितीही लहान असला तरी त्याचे म्हणणे ऐकून घेणे, कार्यक्रम, योजना याबाबतचे आराखडे ठरवताना सर्वांची मते जाणून घेणे, सर्वांना निर्णय प्रक्रियेत सामील करुन घेणे, आपल्या हाताखालच्या माणसांना; आपल्याकडील कर्मचार्‍यांना बरोबरीने वागवणे सरांच्या अंगी असलेल्या या गुणांमुळे सरांनी हाती घेतलेले सर्वच उपक्रम ते सहजरित्या यशस्वी करतात. एखादी योजना मनात आलीच तर ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थच बसत नाहीत. मानापमानाच्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून, हाती घेतलेल्या कामावर निष्ठा ठेवून, सहकारी मदतीला असोत अगर नसोत प्रसंगी ‘एकलो चलो रे’च्या भूमिकेत ते आपले काम अव्याहत सुरुच ठेवतात.

त्यांचे हे कार्य असेच अखंड सुरु राहो; यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !

– श्री.रोहित वाकडे,
संपादक साप्ताहिक लोकजागर,
फलटण, जि.सातारा.


Previous Post

फलटण बाजार समितीत सत्ताधारी गटाला छत्री तर विरोधी गटाची कपबशी चिन्ह

Next Post

फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद; श्रीमंत संजीवराजेंनी केला शुभारंभ

Next Post

फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद; श्रीमंत संजीवराजेंनी केला शुभारंभ

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!