
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी फलटण तालुक्यातील सासकल येथे कृषी विभागाच्या वतीने ‘हुमणी कीड व भुंगेरे नियंत्रण’ मोहीम हाती घेण्यात आली असून, शेतकऱ्यांना ‘प्रकाश सापळे’ (Light Traps) लावण्याचे मार्गदर्शन केले जात आहे.
स्थैर्य, सासकल, दि. १३ जून : तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे आणि उपकृषी अधिकारी अजित सोनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात खरीप हंगामासाठी विविध कृषी मोहिमा राबवल्या जात आहेत. कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या उपाययोजनांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून सासकल (ता. फलटण) येथील शेतकरी श्री. शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतावर हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा लावण्याचे प्रात्यक्षिक पार पडले.
हुमणी कीड आणि भुंगेरे नियंत्रण कसे करावे?
कृषी विभागाने हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे प्रभावी उपाययोजना सुचवल्या आहेत:
वेळ आणि ठिकाण: साधारणपणे जून-जुलै महिन्यात पहिला पाऊस सुरू होताच संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान हे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात आणि बाभूळ, कडुनिंब किंवा बोर यांसारख्या झाडांवर जमा होतात.
नियंत्रण पद्धत: भुंगेरे नष्ट करण्यासाठी झाडांच्या फांद्या जोराने हलवून त्यांना खाली पाडावे आणि रॉकेल मिश्रित पाण्यात गोळा करून ते नष्ट करावेत.
प्रकाश सापळे (Light Traps): रात्रीच्या वेळी भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी शेताजवळ प्रकाश सापळे लावावेत. यामध्ये भुंगेरे अडकून मरण पावतात.
फायदे: प्रौढ भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण केल्यास मादी अंडी घालणार नाही. पर्यायाने जमिनीखाली पिकांची मुळे कुरतडणारी हुमणी अळी तयार होणार नाही. यामुळे पिकांचे मोठे नुकसान टळून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कृषी विभागाच्या या जनजागृतीमुळे सास्कल गावात शेतकऱ्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रकाश (लाईट) सापळे लावले असल्याची माहिती ‘कृषी सेवारत्न’ तथा सास्कलचे सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी दिली.
