आषाढी वारीनिमित्त काळबादेवीच्या माऊली फाऊंडेशनकडून वृक्षारोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जून २०२३ | फलटण |
माऊली फाउंडेशन, काळबादेवीच्या आषाढी वारी कॅम्पची सुरूवात ‘वसुंधरा संवर्धन’ या कार्यक्रमाअंतर्गत फलटण येथे दि. २० जून २०२३ रोजी फलटण नगरपरिषद शाळा, शिवाजी नगर येथे वड, पिंपळ, उंबर, बेल, लिंब या पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण माऊली फाउंडेशनचे सर्व सेवेकरी व फलटण येथील जैन सोशल ग्रुप यांनी प्रा. डॉ. सुधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. झाडे जगविण्याची जबाबदारी फलटण नगरपरिषद शाळेने यांनी घेतली आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी फलटण ते वेळापूरपर्यंत (२१ जून ते २५ जून) माऊली फाउंडेशन, काळबादेवी यांच्यावतीने वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व अन्नदान सेवा देण्यात आली. माऊली वारकर्‍यांना उच्च प्रतीचे महाप्रसाद वाटून सेवा तर केलीच पण वैद्यकीय सेवा फक्त औषधे देऊन नाही तर वारीमध्ये पायी चालणार्‍या वारकर्‍यांचे पाय दाबून व त्यांना फिजिओथेरपी तसेच अ‍ॅक्युप्रेशर देऊन सेवा करण्यात आली.

या कॅम्पमध्ये साधारण १२० च्या वर माऊलीचे महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथून आलेले सर्व स्तरावरचे कार्यकर्ते सेवा करत होते. फलटणमधील प्रसिद्ध समाजसेवक श्री. निलेश गाणबोटे, प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवक श्री. मंगेश दोशी गुणवरेकर, जैन युवकांची संघटना श्री. सन्मती सेवा दल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्थेचे सर्वेसर्वा श्री. मिहीर बाहुबली गांधी, नातेपुते येथील त्रिलोक सेवा समितीचे सर्वेसर्वा डॉ. तेजस चंकेश्वरा, नातेपुते येथील प्रसिद्ध व्यापारी शाहिद बागवान साहेब यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेवून माऊली फाऊंडेशन (काळबादेवी), मुंबईतर्फे स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

फलटणमधील ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता व पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांनी माऊली फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन जनमानसात वृत्तपत्राद्वारे पोहचविण्यात मदत केली. आषाढी वारी कॅम्पला राजकीय नेते, पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन वारकर्‍यांची मनोभावे सेवा केली. माऊली फाउंडेशनला फलटण, राजुरी, नातपुते, माळशिरस आणि वेळापूर येथे स्थानिक लोकांनी खूप मदत केली. त्या सर्व लोकांचे, माऊली सेवेकरी यांचे व माऊली फाउंडेशन काळबादेवीच्या देणगीदारांचे माऊली फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!