बाल हृदय रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । मुंबई । “हृदयरोगाने आजारी मुलांपेक्षा जास्त वेदना त्यांच्या पालकांना सहन कराव्या लागतात. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो”, असे प्रतिपादन  राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

नवी मुंबई खारघर येथील “श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्कील्स”चा ५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी  डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ.प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.

“आजपर्यंत हजारो बालकांवर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले असून त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, आजारी हृदयाला बरे करण्यासाठी आपल्याला चांगल्या हृदयाची गरज आहे आणि रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी मनाची गरज आहे. जन्मजात हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे.भारतात जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांची अंदाजे संख्या दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोगाचे निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रीत करून प्रतिबंध हे आमचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे. गर्भवती मातांनी गर्भधारणे दरम्यान निरोगी जीवन शैलीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे”.

“जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत.असे केल्याने, मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरित्या कमी करता येईल आणि मौल्यवान जीव वाचवता येतील. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो. श्री सत्य साई संजिवनी रिसर्च फाउंडेशन जन्मजात हृदयविकारावर संशोधन करत असल्याचे पाहून आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करुन यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी  शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!