
स्थैर्य, म्हसवड, दि. १३ : लातूर-सातारा महामार्गावर म्हसवड-माळशिरस रस्त्यावर जळभावी घाटाच्या उतारावर माळशिरस हद्दीत महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी भली मोठी चर खोदून माळशिरसकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे असंख्य वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की महामार्गावर शासनाची किंवा कोणाचीच तमा न बाळगता नवीन रस्त्याच्या मधोमध भल्या दोन मोठ्या चारी खोदून संपूर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद केल्याने अनेक वाहनधारकांसह, गंभीर रुग्णाची दयनीय अवस्था झाली आहे. कारण हा रस्ता एकीकडे अकलूज, माळशिरस व दुसरीकडे म्हसवड या दोन्ही शहरांना जोडला जात आहे तसेच दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय रहदारीचा मार्ग आहे. परंतु कोणी तरी विनाकारण रस्त्याचे खोदकाम करून वाहतूक ठप्प केली आहे.
सदर ठिकाणच्या रस्त्याची नासधूस करून प्रवाशांना व आजारी लोकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर घटनेचा माळशिरस पोलीस स्टेशन व माळशिरस तहसीलदार यांनी त्वरित रस्त्याचे नुकसान करणार्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून सदर रस्ता पूर्ववत सुरू ठेवावा, अशी मागणी असंख्य वाहनधारकांनी व प्रवाशांनी केला आहे.