पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघाजणांची सुखरूप सुटका; सरडे येथील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
नीरा नदीतील पुराचे पाणी कमी झाले म्हणून शेळ्या व मेंढ्या चारायला गेलेल्या सरडे येथील कुरण क्षेत्रात सायंकाळी पाण्याचा वेढा पडल्याने तीनजण पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले होते. प्रशासनाने गावकर्‍यांना मदतीने अथक प्रयत्नाने त्यांची आज सुखरूप सुटका केली.

मंगळवार, दि. २७ रोजी दुपारी सरडे येथील कुरण क्षेत्रात नीरा नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने सोपान नारायण भंडलकर (वय ६०), पोपट सदाशिव चव्हाण (वय ६०) शंकरआप्पा घोलप (वय ६५) हे तिघेजण शेळ्या व गुरे चारायला घेऊन गेली होते. मात्र, प्रशासनाने सूचना देऊनही ते सायंकाळी उशिरापर्यंत तेथे थांबले व पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुराच्या पाण्यात अडकले होते.

त्या तिघांना रात्रभर तिथेच थांबावे लागले. रात्रभर परिस्थितीचा आढावा घेऊन मंडलाधिकारी दिलीप कोकरे यांनी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना बरोबर घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या उपस्थितीत नीरावागज, ता. बारामती येथील मच्छीमार बांधव आबा पाटोळे, हणमंत धुमाळ, अमोल परदेशी, संदीप धुमाळ यांनी व गावातील मच्छिंद्र करडे, उमाजी घोलप, गणेश चव्हाण यांनी तिघांना सुखरूप बाहेर काढले.

या कामी मंडलाधिकारी दिलीप कोकरे, माजी सरपंच दत्ता भोसले, विशाल मोरे, संजय जाधव, रामदास शेंडगे, पोलीस पाटील मनोज मोरे, गावकामगार तलाठी प्राची वाबळे, उपसरपंच सचिन बेलदार, भगवान गायकवाड, बाळासाहेब करडे, संतोष भोसले, आदेश भोसले, सोमनाथ जाधव, चेतन करडे, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब आडके, अनिल चव्हाण यांनी व ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी या मदतकार्यात सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!