मराठा वधू-वर पालक परिचय मेळावा : अनुरुप जोडीदार निवडण्याची नामी संधी!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मराठा क्रांती मोर्चा, मध्यवर्ती कार्यालय, फलटण यांच्या वतीने रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सजाई गार्डन मंगल कार्यालय, विमानतळानजीक, जाधववाडी, फलटण येथे मराठा वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नियोजित वधू-वर व त्यांच्या पालकांना उपस्थित राहून योग्य वधू-वर निवडीसाठी या परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.

हल्ली मराठाच नव्हे सर्वच समाजात मुला-मुलींचे लग्न जमविणे हे जिकिरीचे होऊन बसले आहे. पूर्वी नात्यातून स्थळे येत होती, ती पद्धत आता बर्‍याच अंशी बंद झाली आहे. आजच्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पै-पाहुण्यांना एकमेकांकडे जाण्यासाठी, एकमेकांना स्थळ सूचविण्यासाठी वेळ मिळत नसल्याने मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय, फलटणच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करून सुशिक्षित, उच्चशिक्षित, अल्पशिक्षित, नोकरदार, शेतकरी, उद्योजक, व्यापारी वगैरे विविध क्षेत्रातील पालक व त्यांच्या उपवर मुला-मुलींना एकत्र आणून त्यांचा परिचय करून देवून योग्य वधू-वर निवडीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्याद्वारे करण्यात येत आहे. सर्वांनी आपल्या परीने साथ करून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वधू-वर पालक परिचय मेळाव्यास उपस्थित राहून लग्न जमण्याचे प्रमाण सर्वच समाजात अलीकडे वाढत आहे. नाममात्र शुल्कात थेट मुला-मुलींना पाहण्याची, एकमेकांना समजावून घेण्याची, एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेण्याची संधीच या मेळाव्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहे. या मेळाव्यात पसंती झाल्यास संयोजकांच्या माध्यमातून नातेसंबंध जुळावेत यासाठी मध्यस्थी करण्यात येईल; परंतु प्राथमिक माहितीसाठी या मेळाव्याचा चांगला उपयोग होत असल्याच्या समाजातील पालकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपणही सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आपला मुलगा अथवा मुलगी यांच्यासाठी अनुरुप जोडीदार मिळावा यासाठी वधू-वर पालकांनी या मेळाव्यात आपला मुलगा/मुलगी यांच्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वधू-वर पालक परिचय मेळाव्यासंबंधी अधिक माहिती अथवा नाव नोंदणीबाबत मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय, रिंग रोड, फलटण येथे अथवा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!