स्थैर्य, पुणे, दि.१: शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, शिर्डीमध्ये लागलेल्या या फलकांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात ते चालते. मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध कशाला, असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, अशा आशयाचे फलक लावणे हा भारतीय घटनेचा अवमान आहे. शिर्डीमध्ये देश-विदेशातून भक्त येत असतात. ते वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने भक्तांनी सभ्य पोशाख परिधान करून येण्याचे आवाहन केले आहे. तसा फलक लावला आहे. भारतात घटना आहे आणि घटनेने अभिव्यक्ती आणि व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे हा घटनेचा अवमान आहे. मंदिरात कशाप्रकारचे कपडे घालायचे याचे भान भाविकांना असते.
साई संस्थानने मंदिराच्या आवारातून हे फटक हटवावेत, अन्यथा ते आम्हाला काढावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. अनेक मंदिरात आणि शिर्डीतही पुजारी अर्धनग्नावस्थेत असतात. मात्र अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी मंदिरात प्रवेश नाही, असे कधी कुठल्या भक्ताने फलक लावले नाहीत, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.
शिर्डीत दर्शनासाठी येणारे काही भाविक तोडके कपडे घालून येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर साई संस्थानने भाविकांना आवाहन करणारे फलक लावले होते. मंदिरात तोडके कपडे घालून येऊ नका, भारतीय पेहराव परिधान करून या, असे आवाहन या फलकांमधून करण्यात आले होते.