

फलटण येथील यशवंत बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 08 जून : फलटण येथील बहुचर्चित यशवंत बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आणि बँकेचा तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर याला जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी सुनावणीअंती चरेगावकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
यशवंत बँक प्रकरणातील मुख्य संशयित शेखर चरेगावकर याला २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी चरेगावकर याने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सलग दोन दिवस सुनावणी पार पडली.
या सुनावणीदरम्यान न्यायालयामध्ये सरकारतर्फे ॲड. पुष्पा जाधव आणि ठेवीदारांच्या वतीने ॲड. नीलेश जाधव यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने संशयित चरेगावकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.