

फलटण येथील स्वामी लॉजमध्ये औषध प्राशन केलेल्या किरण ढवळे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सासरच्या १० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ जून : माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील एका तरुणाला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांसह १० संशयित आरोपींवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने फलटणमधील एका लॉजमध्ये औषध प्राशन केले होते, ज्याचा बारामती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
किरण महादेव ढवळे (रा. दहिगाव, ता. माळशिरस) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. किरण याचा जून २०२१ मध्ये गावातीलच कोमल सावंत हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, काही काळाने त्यांच्यात वाद सुरू होऊन माळशिरस कोर्टात घटस्फोटाची केस सुरू झाली होती. या केसच्या कारणावरून ऑक्टोबर २०२१ पासून जून २०२६ पर्यंत किरण याला त्याचे सासरचे लोक विविध कारणांनी मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार दाखल झाली आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून किरण याने फलटण येथील स्वामी लॉज येथे औषध प्राशन केले होते. त्याला तातडीने बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृत तरुणाची बहीण शितल महादेव ढवळे हिने फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत किरणचे सासरे दादासो निवृत्ती सावंत, चुलत सासरे शहाजी निवृत्ती सावंत, विजय निवृत्ती सावंत, चुलत मेहुणे आदित्य शहाजी सावंत, यश विजय सावंत, चुलत सासू मनिषा शहाजी सावंत, मेहुणी मयुरी दादासो सावंत, साक्षी विजय सावंत, शहाजी उत्तम मगर (सर्व रा. दहिगाव) आणि बापू लक्ष्मण चव्हाण (रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
