सातारा: १४ वर्षीय धैर्या कुलकर्णीची गगनभरारी – युनाम शिखर सर


साताऱ्याची १४ वर्षीय गिर्यारोहक धैर्या कुलकर्णी हिने हिमाचल प्रदेशातील ६ हजार १११ मीटर उंचीचे आव्हानात्मक युनाम शिखर यशस्वीरित्या सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 08 जून : साताऱ्याची १४ वर्षीय गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी हिने हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वत रांगेतील ६ हजार १११ मीटर उंचीचे आव्हानात्मक युनाम शिखर यशस्वीरित्या सर केले आहे. याआधी एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलीमंजारो आणि माऊंट एलब्रुस सर करणाऱ्या धैर्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर ही धुरंधर कामगिरी नोंदवली आहे.

अपयशावर मात करत नवी झेप

काही काळापूर्वी धैर्याने हिमाचल प्रदेशातील ५ हजार २८९ मीटर उंचीचे फ्रेंडशिप शिखर सर करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे शिखर अवघ्या ३०० ते ४०० मीटरवर असताना तिला माघार घ्यावी लागली. या अनुभवातून शिकत तिने लगेचच २० हजार ४९ फूट (६ हजार १११ मीटर) उंचीच्या आणि अधिक आव्हानात्मक असलेल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई केली. २२ मे रोजी सुरू झालेली तिची ही मोहीम ५ जून रोजी पूर्णत्वाला गेली.

जागतिक स्तरावर साताऱ्याचा ठसा

वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी धैर्याने आव्हानात्मक एव्हरेस्ट बेस कॅम्प (५ हजार ५४५ मीटर) सर केला होता. त्यानंतर तिने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमंजारो (५ हजार ८५० मीटर) आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रुस (५ हजार ६४२ मीटर) यशस्वीरित्या सर केले. उणे तापमान, बर्फ, आणि ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या कठीण परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळवले आहे. याशिवाय तिने कळसूबाई, गिरनार, सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले आणि नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा पूर्ण केली आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पाठबळ

युनाम शिखर मोहिमेसाठी धैर्याला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ आणि डॉ. सुरभी लिऊआ यांचे मार्गदर्शन मिळाले. यासोबतच गेली सहा वर्षे प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबले यांचेही तिला सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. धैर्या ही सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची कन्या असून ती सध्या साताऱ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.


Back to top button
Don`t copy text!