

पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार लखन मोरे यांचा सचिन यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ जून : नेपाळमध्ये पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे. या विजयाबद्दल भारतीय संघाचे कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
काठमांडू येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानचा ७-० असा मोठा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन मोरे यांनी केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल के. बी. उद्योग समूहाकडून त्यांच्या क्रीडा योगदानाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी सचिन यादव म्हणाले, खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून तो शिस्त, समर्पण आणि देशभक्तीची भावना विकसित करतो. लखन मोरे यांनी मिळवून दिलेले यश युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. के. बी. उद्योग समूहामार्फत क्रीडा, कला आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिभावान गुणवंतांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.
सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून दक्षिण आशियाई देशांमध्ये तो वेगाने लोकप्रिय होत आहे. भारताने या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवून या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले असून लखन मोरे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.