स्थैर्य,पुणे,दि ९: पुण्यात कोथरुडसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात बुधवारी सकाळी अचानक रानगव्याने दर्शन दिल्याने खळबळ माजली. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाने गव्याला जेरबंद करण्यात यश मिळवले पण, नागरी वस्तीत शिरल्याने बिथरलेल्या, घाबरलेल्या आणि लोकांच्या पाठलागामुळे दमलेल्या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी सहाच्या आसपास कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकपाशी फिरायला आलेल्या मंडळींना हा प्राणी दिसला. सुरवातीला गाय किंवा म्हैस असावी, अशा समजुतीत असलेल्या नागरिकांची या प्राण्याचा डुरकण्याचा आवाज ऐकताच घाबरगुंडी उडाली. हा प्राणी गाय, म्हैस नसून रानगवा आहे , हे लक्षात येताच पळापळ सुरू झाली. काही नागरिकांनी त्वरित पोलिस, मनपा आणि वनविभाग तसेच अग्निशमन दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर हालचाल सुरू होऊन प्रत्यक्ष रेस्क्यू टीम्स दाखल होईपर्यंत अकरा वाजून गेले होते. तोपर्यंत बघ्यांची गर्दी, पाठलाग करणारे लोक आणि मोबाइलमध्ये सारे शूट करण्यासाठी धावणारी मंडळी यामुळे गवा बिथरला आणि महात्मा सोसायटी परिसराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारुन इंदिरा शंकर सोसायटी, भुसारी काॅलनी, गादिया इस्टेट, भारतीनगर सोसायटी असा सुसाट धावला. त्याच्या पाठोपाठ बघ्यांची गर्दी धावत होती. वाटेत धावताना गव्याची धडक बसून काही वाहनांचे नुकसान झाले. गवाही जखमी झाला. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. गवा धावून थकला होता. महात्मा सोसायटीपासून तो जवळपास सहा किलोमीटर अंतर धावला होता. तशात भुलीचे इंजेक्शन दिल्यावर तो बेशुद्ध झाला.
त्यानंतर त्याला जाळ्यात गुंडाळून गाडीत ठेवण्यात आले. मात्र झालेले श्रम, जखमा, धाप आणि भुलीचे इंजेक्शन यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच गव्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वनविभाग अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.
सहा फ्लॅट आणि दोन दुकाने गहाण ठेऊन गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतले 10 कोटींचे कर्ज
सकाळी सहापासून गव्याला पकडण्यासाठी सुरू असलेले वनविभागाचे प्रयत्न पाच तासांनंतर यशस्वी झाले पण गव्याचा दुर्दैवी मृत्यू ते रोखू शकले नाहीत, याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
वीस वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात कात्रजजवळही रानगवा आला होता, त्या प्रसंगाची आठवण यावेळी झाली. मात्र तेव्हा रानगव्याला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात सोडण्यात यश मिळाले होते.