
स्थैर्य, वाई, दि. १५ : वाई शहराला दिवसेंदिवस घट्ट विळखा बसत आहे. गेल्या महिन्यात स्थानिक रिक्षावाला त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातले दोन कर्मचारी बाधित झाले होते. ते बरे झाले ताेच व्यापाऱ्यांना करोनाने घेरले. वाई पोलीस ठाणे तावडीत सापडले. आता तर करोनाच्या विळख्यात लोकप्रतिनिधी अडकले आहेत. तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगरसेविकेला बाधा झाली आहे. जिल्ह्यातील पहिलीच लोकप्रतिनिधी करोना बाधित आढळून आली असून गत आठवड्यात तिने एका लोकार्पण सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यामुळे वाई शहरवासियांना करोनाचा विळखा घट्ट पडू लागला आहे.
वाई शहरात वाईकरांनी अगोदर काळजी घेतली होती. त्यामुळे सगळ्यात जिल्ह्यात वाई शहर पिछाडीवर होते. वाई शहर करोना मुक्तीच्या वाटेवर असताना पुन्हा वाई शहरातील व्यापारी, ब्राम्हणशाहीतील वयोवृद्ध बाधित झाली. साखळी वाढू लागली. वाई पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसाकडून करोनाचा शिरकाव झाला. त्यांच्या संपर्कात आलेले 12 पोलीस दोन दिवसांपूर्वी बाधित झाले. रात्री आणखी दोन पोलीसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाई शहरात नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. या नगरसेविकेच्या सासऱ्याला दोन दिवसांपूर्वी बाधा झाली होती. त्याच्या संपर्कात आसल्याने तिला बाधा झाली. याच नगरसेविकाचा वॉर्डात गेल्या आठवड्यात एका विकासकामाचा लोकार्पण सोहळा झाला होता. त्या सोहळ्यात अनेक नेते उपस्थित होते, अशी चर्चा आहे.