सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र – संजय राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । मुंबई । आमच्या अनेक लोकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसत नाही का? आमचे कल्याणचे विजय साळवी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्यांना तडीपारीची नोटीस दिलीय. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. देशात सगळ्यात असुरक्षित राज्य महाराष्ट्र आहे अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, राजन साळवी, वैभव नाईक आणि नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आली. गैरव्यवहाराची आम्ही अधिवेशनात प्रकरणे काढली ती एसीबीला दिसत नाही. आमच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे चौकशा केल्या जात आहेत. उद्या आमच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. सगळ्यात असुरक्षित राज्य या सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आहे. कुणालाही कधीही तुरुंगात टाकलं जाईल. राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देतायेत. पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होतं. पोलिसांची प्रतिष्ठा जगामध्ये होती. राजकीय स्वार्थासाठी आमच्या महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नका. जर तुमच्या अंगात खरोखर रग, मनगटात ताकद असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांविरोधात बोला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आदर्श घ्या. स्वाभिमान म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिका असं त्यांनी म्हटलं.

शिवसेना संपवण्याचं स्वप्न भाजपाचं होतं
गिरीश महाजनांनी जे विधान केले ती भाजपाची भूमिका सरकार पाडण्यासाठी होती. शिवसेनेत २ गट पाडण्याचं स्वप्न भाजपाचं जुनं होतं. गिरीश महाजन जे बोलले त्यांचे अभिनंदन करतो. जे पोटात ते होठावर आले. शरद पवारांमुळे शिवसेना फुटली हे म्हणतात. परंतु शिवसेना संपवण्याचं स्वप्न भाजपाचं होतं. महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या आड शिवसेना येऊ शकते त्यामुळे आधी शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपाचं राष्ट्रीय धोरण आहे ते त्यांनी अंमलात आणले. हे आमच्या खोकेबहाद्दर ४० आमदारांना कळालं नाही आणि ते महाराष्ट्राच्या बेईमानीच्या कटात सामील झालेत अशाप्रकारे राऊतांनी भाजपावर आगपाखड केली.


Back to top button
Don`t copy text!