नजरेत भरणाऱ्या सातारा ग्रंथोत्सवाचा गौरव


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा ।नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी व रुजावी आणि ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा कार्यालयाच्या वतीने ‘सातारा ग्रंथोत्सव 2022’ नुकताच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालये यामध्ये सहभागी झाल्याने हा ग्रंथोत्सव केवळ सातारा शहरापुरता मर्यादित न राहता यास संपूर्ण जिल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. उत्कृष्ट नियोजनामुळे शासकीय ग्रंथोत्सवाचा कालावधी किमान तीन ते चार दिवसांचा करण्याबाबत नागरिकांकडून विविध माध्यमातून मागणी होत आहे.

या ग्रंथोत्सवातील दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम वाचकाभिमूख होते. येथील ग्रंथसंपदा व ग्रंथ प्रदर्शनाची व्यवस्था वाचकांना सहजपणे पाहता येईल या दृष्टीने नीटनेटकी करण्यात आली होती. वाचकांचा व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिक, मान्यवर व्यक्ती व संस्थाकडून ग्रंथोत्सव उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारे, वृत्तपत्रातील बातम्यांतून जिल्हा ग्रंथालय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिनंदन व गौरवाचा वर्षाव होत आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील वेळात वेळ काढून या ग्रंथोत्सवास भेट दिली. त्यांनी या महोत्सावांतर्गत भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनातील विविध अभिजात पुस्तकांची आणि श्रेष्ठ व नावाजलेल्या लेखकांची माहिती अत्यंत ओघवत्या शैलीत उपस्थितांना दिलीत.   उपस्थितांशी संवाद साधला. ग्रंथोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करुन मार्गदर्शन केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने अल्पावधीत अतिशय उत्कृष्टरित्या ग्रंथोत्सव राबविल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे   व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रविंद्र भारती-झुटिंग, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रसिध्द व्याख्याते डॉ. श्रीधर साळुंखे, ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे, कवी आनंदा ननावरे व वाचक उपस्थित होते.

‘सातारा ग्रंथोत्सव 2022’ या कार्यक्रमास मिळालेल्या अभूतपूर्व यशाची सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाचे पदाधिकारी व मान्यवर साहित्यिकांनी दखल घेवून केलेल्या गौरवाने कार्यालयातील सर्वांना चांगल्या कार्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी व्यक्ती केल्या. शेवटी अश्वमेध ग्रंथालय व सर्व मान्यवर साहित्यिकांचे  आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!