मोदींचा प्रचाराचा झंझावात; गुजरातमध्ये आजवरचे मतदानाचे रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चार जाहीरसभा घेत झंझावाती प्रचार केला. गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे जनतेला सर्व मतदान केंद्रांवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात प्रार्थना केल्यानंतर वेरावळ शहरातील एका सभेत मोदींनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आणि मागील सर्व मतदानाचे रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन केले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गीर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला, उना, कोडिनार आणि सोमनाथ या चारही विधानसभा जागा जिंकल्या होत्या. धोराजी येथे झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

काॅंग्रेसवर टीका : धोराजीमधील सभेत मोदी यांनी ‘भारत जोडो यात्रे’त नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना सहभागी करून घेतल्याबाबत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तीन दशके नर्मदा धरण प्रकल्प रखडवलेल्या महिलेसोबत काँग्रेसचे नेते पदयात्रा काढत आहेत.

७ बंडखोर निलंबित 
भाजपने निवडणुकीत तिकीट न दिल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या हर्षद वसावा, छत्रसिंह गुंजारिया, अरविंद लडानी, केतन पटेल, भरत चावडा, उदय शाह आणि करण बरैया या नेत्यांना गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी पक्षातून निलंबित केले आहे.

मधू श्रीवास्तव, दिनुभाई पटेल (दिनुम्मा) आणि धवलसिंग झाला या आणखी तीन बंडखोरांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार होता; परंतु, त्यांनी फार पूर्वीच पक्षाच्या उच्चाधिकारातून राजीनामा दिला होता.


Back to top button
Don`t copy text!