पक्षांतरबंदी उल्लंघनप्रकरणी भाजप नगरसेविकांचे भवितव्य आज साताऱ्यात ठरणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, खंडाळा, दि.२४: नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा,
विद्यमान नगरसेविका लता नरुटे आणि विद्यमान उपाध्यक्षा शोभा गाढवे यांनी
पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन करून भाजपच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान
राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी उपाध्यक्ष दयानंद खंडागळे यांनी
त्याविराेधात केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी आज (ता.
24) सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी ठेवली आहे.

माजी नगराध्यक्षा नरुटे व विद्यमान उपाध्यक्षा गाढवे या भाजपच्या गोटात
सामील झाल्या, हे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता
अधिनियमानुसार पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद करून
राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी उपाध्यक्ष खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे
धाव घेतली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी नगरसेविका नरुटे
आणि गाढवे यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुरुवारी (ता.24) दुपारी आपले लेखी
म्हणणे समक्ष उपस्थित राहून अथवा आपल्या वकिलांमार्फत दाखल करावे. यादिवशी
आपण आपले म्हणणे दाखल करण्यास कसूर केल्यास उपलब्ध कागदपत्रे,
पुराव्यांआधारे एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, अशा नोटिसा बजावल्या आहेत.

राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर या नगरसेवक भाजपत गेल्यानंतर 14 जून 2019
रोजी गाढवे यांची उपाध्यक्षपदावर निवड झाली होती. त्यानंतर श्री. खंडागळे
यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केलेल्या तक्रार
अर्जावर दोन वेळा तारखा निघाल्या. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबणीवर
पडत गेली. दरम्यान, सध्या शिरवळ येथे सरपंच अविश्वास मतावरून तालुक्‍यातील
राजकीय वातावरण गरमागरम असताना खंडाळा नगरपंचायतीचे राजकीय वातावरणही तापू
लागले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!