महाबळेश्वरपेक्षा साताराच गारठले


 


स्थैर्य, सातारा, दि.२४ : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात हवेत गारठा
कमालीचा वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या धगधगू झाल्या असून,
नागरिकांनी गाठोड्यात ठेवलेले उबदार कपडे पुन्हा बाहेर काढले आहेत.
दरम्यान, तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या तिबेटियन विक्रेत्यांच्या दुकानांवर
स्वेटर, जर्कीन खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. दरम्यान, साताऱ्याच्या
तापमानाचा पारा आज (गुरवार) सकाळी 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे,
तर जास्तीतजास्त तापमान 25 अंशापर्यंत गेले आहे. आज 13.4 अंश सेल्सिअस इतका
हाेता.

 

दर वर्षी दिवाळीत बऱ्यापैकी थंडी पडते. मात्र, यावर्षी सातत्याने ढगाळ
वातावरणाला तोंड द्यावे लागले होते. कधी अरबी समुद्रातील, तर कधी बंगालच्या
उपसागरातील वादळाने पाऊस आणि थंडी दिवाळी नंतरही नागरिकांनी अनुभवली.
साहजिकच दिवाळीनंतरही काहीकाळ गुलाबी थंडी जाणवलीच नाही. त्यानंतर
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काहीशी थंडी पडली. त्या वेळी तापमापकाचा पारा
28 ते 30 अंशापर्यंत खाली घसरला होता. मात्र, गेले चार दिवस पुन्हा थंडीने
डोके वर काढले असून, आता पारा साधारण किमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली
घसरला आहे, तर जास्तीतजास्त तापमान 23 अंशापर्यंत जात आहे. त्यामुळे गारठा
दिवसभर जाणवत राहात आहे. सायंकाळी पाचपासूनच गारठा झोंबू लागत आहे. रात्री
त्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी गाठोड्यात ठेवलेले जास्तीचे
उबदार कपडे, पांघरुणे बाहेर काढली आहेत. ज्येष्ठ नागरिक हमखास स्वेटर,
कानटोपीत सकाळी दिसू लागले आहेत. थंडीमुळे उबदार कपड्यांच्या दुकानांपुढे
नागरिकांची थोडी वर्दळ वाढली आहे. उबदार ब्लॅंकेटलाही ग्राहक वाढल्याचे
विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान दुकानांमध्ये 700 पर्यंतचे ब्लॅंकेट फूटपाथवर 500 रुपयांस विक्रेते
विकत आहेत. तिबेटियन विक्रेत्यांकडे स्वस्तात उबदार कपडे मिळतात ही
नागरिकांची धारणा आहे. त्यामुळेच पंचायत समितीनजीक तिबेटियन विक्रेत्यांनी
उभारलेल्या टपऱ्यांवर ग्रामीणच नव्हे, तर शहरी ग्राहकही खरेदी करताना आढळ
आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!