जनगणनेचा रंजक इतिहास आणि महत्त्व : ‘खानेसुमारी’ ते आधुनिक ‘सेन्सस’

आज आपण जनगणनेचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर माहिती गोळा करणारे कर्मचारी आणि लोकसंख्येचे प्रचंड आकडे उभे राहतात. परंतु, जनगणनेचा इतिहास हा केवळ लोक मोजण्याचा इतिहास नाही; तो मानवी संस्कृती, राज्यकारभार, करव्यवस्था आणि नागरी विकासाचा एक मोठा दस्तऐवज आहे.

प्राचीन आणि जागतिक इतिहास

एखाद्या राज्यात किती लोक आहेत, शेती किती आहे आणि युद्धासाठी किती सैनिक उपलब्ध होऊ शकतात, या गरजेतून जनगणनेचा जन्म झाला.

  • बाबिलोनिया आणि इजिप्त: सुमारे ६,००० वर्षांपूर्वी या ठिकाणी जनगणनेचे पुरावे आढळतात. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरानंतर जमिनीचे पुनर्वाटप आणि कर आकारणीसाठी मातीच्या फलकांवर नोंदी ठेवल्या जात असत.

  • चीन: इ.स. २ मध्ये झालेल्या जनगणनेत तब्बल ५ कोटी ७६ लाख लोकांची नोंद झाली होती; जी त्या काळातील सर्वात मोठी नोंद मानली जाते.

  • रोमन साम्राज्य: येथे दर पाच वर्षांनी नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेची नोंद होत असे. आज वापरला जाणारा “सेन्सस” (Census) हा शब्द रोमन भाषेतील “सेन्सेरे” या शब्दापासूनच आला आहे.

भारतातील जनगणनेची परंपरा

  • मौर्य काळ: कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रात’ नागरिकांची, व्यवसायांची आणि मालमत्तेची नोंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश आढळतात.

  • मोगल काळ: अबुल फजलने लिहिलेल्या ‘आइन-ए-अकबरी’मध्ये राज्याची लोकसंख्या, शेती, महसूल आणि सामाजिक जीवनाची विस्तृत माहिती दिली आहे.

पेशवेकालीन पुणे आणि मंगळवार पेठेची ‘खानेसुमारी’ (इ.स. १८१८)

महाराष्ट्रात जनगणनेसाठी “खानेसुमारी” हा शब्द प्रचलित होता. पेशवाईच्या अस्तानंतर आणि ब्रिटिशांनी पुण्याचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत (१८१८ मध्ये) मंगळवार पेठेची खानेसुमारी करण्यात आली. हा दस्तऐवज दोनशे वर्षांपूर्वीच्या पुण्याचे जिवंत चित्र उभा करतो.

मंगळवार पेठेतील घरांची स्थिती (१८१८):

तपशील संख्या
एकूण घरे २६१ (७०५ खण)
माडीची घरे ७४
एकमजली घरे ८३
छपरी घरे ८५
खुल्या जागा १७

सामाजिक आणि प्रशासकीय रचना:

  • विविधता: या पेठेत ४६ कुणबी-मराठे, ४२ ब्राह्मण, २७ वाणी, १२ तेली, ६ मुसलमान, ४ जैन, ३ कुंभार, ३ गोसावी आणि १ सोनार यांची घरे होती.

  • प्रशासन: कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तब्बल ४ सरकारी चौक्या कार्यरत होत्या.

  • करसवलत: पेठेतील २ प्रमुख देवळांना आणि गोसाव्यांच्या मठांना करमाफी देण्यात आली होती.

  • प्रतिष्ठित नागरिक: महादेव मायेनकर, सिताराम नाईक चिकटे, बालाजीपंत दामले, भिकाजीपंत सुभेदार आणि हाणवतराव सितोले यांसारखे प्रतिष्ठित मुत्सद्दी आणि सावकार याच पेठेत राहत होते.

आधुनिक जनगणना आणि तिचे महत्त्व

  • सुरुवात: ब्रिटिशांनी १८७२ मध्ये पहिली व्यापक जनगणना करण्याचा प्रयत्न केला आणि १८८१ मध्ये पहिली अधिकृत, देशव्यापी जनगणना पार पडली (तेव्हा लोकसंख्या सुमारे २५ कोटी होती).

  • आजचे स्वरूप: आज भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. पूर्वी जनगणनेचा उद्देश कर आणि सैन्यापुरता मर्यादित होता, मात्र आज ती विकास, नियोजन, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी वापरली जाते.

नागरिकांना आवाहन:

“जनगणना म्हणजे केवळ लोकांची मोजणी नव्हे, तर ती इतिहासाची ‘टाईम मशीन’ आणि काळाची नोंद आहे. भविष्यातील इतिहासकारांना ती आजच्या भारताचे दर्शन घडवेल. त्यामुळे सर्व जनतेने या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला देशाच्या विकासाच्या पायाभरणीचा दूत समजून सहकार्य करावे.”

लेखक: युवराज पाटील (जिल्हा माहिती अधिकारी, पुणे)

Back to top button
Don`t copy text!