पसरणी घाटात कार कोसळली झाडात अडकल्याने जीवित हानी टळली


स्थैर्य,  वाई, दि. १८: वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात सोळा नंबर स्टॉप जवळ चालकांच्या लक्षात वळण न आल्यामुळे रस्त्याचा संरक्षक कठड्यावर चढून दरीत गेली. सुदैवाने काही फूट अंतरावरच कोसळताना झाडाला अडकली. अन्यथा सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. नशीब बलवत्तर म्हणून मोटारीसह सर्वजण बचावले.

पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आलेले होते. काही कामानिमित्त ते आज वाईला आले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉप जवळ त्यांची कार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. काही फूट अंतरावर ती असणार्‍या झाडात अडकल्यामुळे एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. कार क्रमांक (एमएच 12 ओटी 6672) मोटार दुपारी वाईहून पाचगणीकडे निघाली होती. पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धोक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने कार रस्त्यावरील संरक्षक कड्यावर चढून दरीत घुसली. काही फूट अंतर जाताच झाडाला अडकल्याने गाडीतील सर्वांचे प्राण वाचले. कारचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, नशीब बलवत्तर म्हणूनच गाडीतील सर्वांचेच प्राण वाचले, अन्यथा कार तीन-चारशे फूट खाली दरीत कोसळली असती. ही माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!