

स्थैर्य, कोल्हापूर, दि. २१ : कोरोना सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी केली आहे. छावा संघटनेने दुध आंदोलनात सहभागी होत दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव म्हणाले, सध्या स्थितीमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केलं जातं आहे.
जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनत पाहतां हा अन्याय आहे. मुख्यमंत्री महोदय मायबाप आता यातुन मार्ग काढा शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन तुम्हांला आज मी दुधात ठेवून हि मागणी करत आहे असे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री यांना विडीओ द्वारे ट्वीट केले आहे.

