माणदेशातील, शिक्षिका मरगूबाई!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माणदेशाच्या दुष्काळी गांवात एका गरीब कुटुंबातील दगडू व अनुसयांच्या पोटी खंडू व मरगूबाईचा जन्म झालेला होता,दगडू गांवातील लाकडाच्या वखारीत लाकडे कुऱ्हाडीने फोडण्याचे काम मजूरीवर करीत असे.अनुसया गांवातील शेतकऱ्याच्या शेतात भांगलन  करणे, शेत मजुरी करणेसाठी जात असे.दोघांच्याही येणाऱ्या मजुरीतून नवरा बायको घर प्रपंचा चालवीत असत व सुखा समाधानानी राहत असत.गेल्या पावसाळ्यात दगडूचे वडिलार्जित दीड खणाचे जुने धाब्याचे घर पडलेले असलेमुळे दगडूचे सदर जागेचा सर्व मलबा बाजूला काढून सदर ठिकाणीच झोपडी वजा चिखल मातीच्या भेंड्याच्या भिंती उभारून त्यावर लाकडाचे उभे आडवे वासे बांधून त्यावर गव्हाच्या काडानी घर शेकरून घर उभे केले होते,त्यामुळे दगडूच्या कुटुंबाची राहण्याची सोय झाली होती.दगडू व अनुसया हे काबाड कष्ट करून दोन मुलांसह आयुष्य जगत होती.खंडू व मरगूबाईस गांवच्या शाळेत घातलेले असलेमुळे त्यांचे शिक्षण सुरु होते आणि शाळेत जात होते. परंतु खंडूचे मन शाळेत रमत नव्हते. अभ्यास, शाळा म्हटले की त्याच्या अंगावर काटा येत असे.त्यामुळे तो शाळेत जायचा टाळाटाळ करीत असलेमुळे दगडूने विचार करून खंडूस चार शेळ्या घेऊन दिल्या होत्या.त्यामुळे खंडू शेळ्या घेवून कुरणात राखायला जात असे. मरगूबाई अभ्यासात हुशार असलेमुळे दरवर्षी पास होऊन वरच्या वर्गात जात होती.

जणगनणेचा सर्वे करणेसाठी अधिकारी घरोघरी फिरून लोकांची माहिती घेत असताना दगडूच्या घरची माहिती घेऊन फॉर्मवर सही घेत होती.त्यावेळी दगडू कामावर गेल्यामुळे अनुसयाने तोंडी माहिती दिली व सहीच्या ऐवजी फॉर्मवर अंगठा दिला.त्यावेळी सदरचे अधिकारी म्हणाले,सदरच्या वस्तीत सर्व अंगठेबहाद्दूरच दिसतात. हे शब्द मरगूबाईने ऐकलेले होते. त्यामुळे तिने ठरविले की आपण खूप शिकले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. या जिद्दीने शिक्षण घेवू लागली होती. कारण आपले आई-वडील, भाऊ अशिक्षित आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना अडाणी पणाचा शिक्का मारलेला आहे. याची जाणीव तिला झालेली होती. त्यामुळे मरगूबाई हायस्कूलच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी एस.टी.बसने येत जात होती. मरगूबाई ज्या वस्तीत राहत होती. त्या वस्तीतील बहुसंख्येने लोक टपाल,पत्रे लिहिणेसाठी, वाचणेसाठी मरगूबाई कडे येत असत. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झालेवर वडिलांच्या संमतीने तिने कॉलेजला अॅडमिशन घेतलेले होते. सुरुवातीला तिला वाटत होते की, आपण नर्सचा कोर्स करून दवाखान्यात लोकांची सेवा करावी, परंतु कॉलेजच्या सरांनी सांगितल्यामुळे तिने डी.एड. चा कोर्स करून शिक्षिकेच्या परीक्षेला बसली होती. सदरच्या शिक्षिकेच्या परीक्षेला व मुलाखतीस चांगल्या मार्कांनी पास झालेली होती. त्यावेळीस दगडू व अनुसया यांनी वस्तीतील पहिली मुलगी शिक्षिका झाली म्हणून वस्तीत पेढे वाटलेले होते.
मरगूबाईची एका गावातील शाळेवर शिक्षिका म्हणून नियुक्ती झालेली होती, त्यामुळे आपले वडिलांना सोबत घेऊन मरगूबाई त्या गावच्या शाळेत हजर झाली.  शाळेजवळच  भाडोत्री खोली घेतली. त्यानंतर नियुक्तीचे पत्र मुख्याध्यापकांना दाखविले.  त्यांनी रितसर शाळेवर हजर करून घेतले. त्यावेळीस मुख्याध्यापक म्हणाले, तुमचे नांव मरगूबाई आहे, परंतु तुम्हाला बोलताना जरा अवघड वाटते, म्हणून तुम्हाला एम.डी. मॅडम म्हणून हाक मारली तर चालेल का ? तेव्हा मरगूबाई म्हणाली, माझी काही हरकत नाही ? त्यावर मुख्याध्यापक म्हणाले, हे नांव कसे काय ठेवण्यात आले होते. तेव्हा मरगूबाई सांगू लागली, माझे आई- वडील देव भोळे आहेत. आमच्या गांवात मरीमातेची जत्रा भरते, त्यावेळीस माझा जन्म झालेला असलेमुळे आई-वडिलांनी मरगूबाई हे नांव ठेवलेले आहे. त्यावर मुख्याध्यापक म्हणाले, ठीक आहे. एम.डी. मॅडम असे म्हणून त्यांनी दुसरी इयत्तेच्या वर्गावर त्यांची नेमणूक केली.
मरगूबाईस शाळेतील पहिला दिवस आनंदात गेला, सर्व शिक्षक- शिक्षकेच्या ओळखी करून घेतल्या, वर्गातील सर्व मुलांची माहिती घेतली. शाळा सुटलेनंतर भाडोत्री रूमवर आनंदात येऊन विसावली. काही दिवसांनी दगडू व अनुसयाने जवळच्याच  पाहुण्याकडील मुलगी पाहून, खंडूचे लग्न लावणेत आले, याबाबत मरगूबाईने खंडूच्या लग्नासाठी आर्थिक तरतूद उभी केली होती. खंडू चे लग्न व्यवस्थित पार पडले नंतर घरात मालती म्हणून नवीन सून आलेली होती. त्यामुळे दगडू व अनुसयाच्या डोक्यावरचे मोठे ओझे मरगूबाई उतरले होते. लग्न सोहळा झालेवर मरगूबाई शाळेवर हजर राहून मुलांना प्रेमळपणे शिकवित होती. सर्वांशी विनम्रपणे वागत असे. शाळेच्या कुठल्याही कामाला आळस करीत नव्हती. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक वर्गातील मुले समाधानी होती. मुलांना गाणी, कविता, गोष्टी, पाठ्यपुस्तकातील धडे शिकवीत असलेमुळे मरगूबाईची एम.डी. मॅडम म्हणून गांवभर ख्याती होऊ लागली असलेमुळे एका शिक्षिकेच्या मनात मरगूबाई बद्दल आकस निर्माण झालेला होता. त्यामुळे गांवातील काही लोकांना हाताशी  धरून त्यांना मरगूबाई बद्दल फितविल्यामुळे त्या लोकांनी मरगूबाई बद्दल वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केलेल्या असलेमुळे तिची बदली दुसऱ्या गांवी करणेत आलेली होती. वास्तविकता मरगुबाई ही गरीब समाज्यातून आलेली असलेमुळे तिला पाठबळ नव्हते. परंतु मरगूबाईने त्याबाबत कुठेही तक्रार न करता दुसऱ्या गांवात शिक्षिका म्हणून हजर राहिली. सदर शाळेमध्ये मरगुबाईस इयत्ता चौथीचा वर्ग देण्यात आला होता. सदर मुलांना जीव ओतून  शिकवित होती, त्यामुळे मुलांना शाळेची चांगल्या प्रकारे आवड निर्माण होऊ लागली होती. मुलांना शाळेत कंटाळा यायला लागल्यावर शाळेच्या मैदानावर कबड्डी, खो-खो, लेझीम शिकवित असलेमुळे मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली होती. मरगूबाई दिसायला काळी सावळी होती, उंची माफक, बोलके डोळे, बोलण्यात नम्रपणा, आपले काम व आपण असा शिरिस्ता ठेवल्यामुळे ती कुणाच्या आधात-मधात पडत नसे. शाळा व घर असे वेळापत्रक तिने स्वतःला करून घेतलेले होते.  त्यामुळे शाळेत मुलाचे प्रमाण वाढत चालले होते. वर्गातील मुलांचे पास होण्याचे प्रमाण वाढलेले असलेमुळे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांचे मध्ये मरगूबाई बद्दल आदराचे स्थान निर्माण झालेले होते. त्याचवेळी गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेची चांगली प्रशंसा करून मरगूबाईस शाबासकी दिली होती.

मरगूबाई शिक्षिका म्हणून स्थिर-स्थावर झालेवर शिक्षक बँकेकडून कर्ज काडून आई-वडिलांना नवीन पत्र्या- विटाचे घर बांधून दिलेले होते. त्यामुळे जुन्या झोपडीच्या जागी नवीन घर बांधून देण्यात आलेले असलेमुळे दगडू, अनुसया, खंडू व मालती सदर घरात आनंदाने राहू लागले होते. कारण दर पावसाळ्यात काडाचे घर गळत असलेमुळे रात्री झोपणेसाठी काही वेळा समाज मंदिरात सर्वांना आसरा घ्यावा लागत असे. त्यामुळे नवीन पत्राच्या घरात समाधाने राहत असत. मरगूबाईने आई-वडिलांना काबाड कष्ट करणेचे बंद केले असलेमुळे घर प्रपंच्यासाठी आपल्या पगारातून पैसे पुरवीत असे व आई-वडिलांची व्यवस्थित देखभाल करीत असे. त्यामुळे खंडू व मालतीची मरगूबाईस  खंबीर साथ होती.  हे पाहून दगडू व अनुसया हे परमोच्च आनंदाने दिवस जगत होते. एके दिवशी अनुसया व मालती घाबऱ्या-घुबऱ्या होऊन मरगूबाईच्या शाळेवर रडत आल्या. त्यावेळी मरगूबाईने विचारले की, तुम्ही कशापायी रडताय ? का घाबरला आहे ? ते मला सांगा ? त्यावर मालती म्हणाली, माझ्या नवऱ्याला पोलीस पकडून तालुक्याला घेऊन गेलेले आहेत ? हे वाक्य ऐकताच मरगूबाईस धक्का बसला, तिने रजेचा अर्ज देऊन आई-वडिल, मालतीला घेऊन तालुक्याच्या पोलीस स्टेशनवर हजर झाली. त्यावेळी मरगूबाई पोलीस फौजदार साहेबांना म्हणाली की, खंडूस कशापाई पकडून आणलेले आहे, मी त्याची बहीण असून माझे सोबत आई-वडील व त्यांची पत्नी आहे ? त्यावर फौजदार साहेबांनी ठाणे अंमलदारास सांगितले की, खंडूस बोलावून आणा ? त्यावर ठाणे आमंलदार खंडूस साहेबा समोर हजर केले. खंडूचा अवतार पाहून घरच्याच्या  डोळ्यात पाणी उभे राहिले. फौजदार  साहेब म्हणाले, तुमच्या खंडूने गांवातील दोन माणसावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे ?  त्यामुळे त्याला पकडून आणलेले आहे. त्यावर दगडू म्हणाला, साहेब माझा खंडू गरीब आहे. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय सुद्धा देत नाही. आमच्या वस्तीत कुणा बरोबर सुद्धा साधी वादा-वादी करीत नाही. आम्ही गरीब माणसे दिवसभर काबाड कष्ट केल्याशिवाय आमच्या हाता- तोंडाला घास मिळत नाही. त्यानंतर मरगुबाई म्हणाली, खंडू दादा नेमके काय घडलेले होते ते सांगा ? त्यावर खंडू सर्वाकडे पाहत म्हणाला, साहेब माझी काहीही चुकी नाही. परंतु इथे माझे आई- वडील, बहिण, बायको आली आहेत. त्यामुळेच  खरे काय ते तुम्हाला सांगतो असे म्हणून मोठा ऊसासा घेऊन बोलू लागला.

बेंदराच्या सणाच्या अगोदर गांवातील संग्रामने करीच्या सणासाठी माझ्याकडून एक बोकड घेऊन गेलेला होता. त्याचे पैसे आठवड्यानंतर देतो म्हणाला असलेमुळे मी काही बोललो नाही. त्यानंतर करीच्या दिवशी सकाळी येऊन अजून एक बोकड घेऊन गेला होता. त्यावेळेस तो म्हणाला दोन बोकडाचे पैसे एकदम देतो म्हणाला होता. त्यामुळे मी ही विचार केला की, संग्राम आपल्याच गावातील आहे, देईल आठवड्या नंतर पैसे म्हणून मी काय बोललो नाही. रोज शेळ्या कुरणात  चारायला घेऊन जात असलेमुळे माझ्या काही लक्षातच राहिले नाही. ह्या मध्ये दोन-तीन आठवडे निघून गेले. परंतु एके दिवशी कुरणातून शेळ्या घेऊन येत असताना त्याची माझी भेट झाली. त्या वेळीस संग्राम म्हणाला, माझेकडे आता पैसे नाहीत, वाड्यावर येऊन पैसे घेऊन जा ? त्यावर मी ठीक आहे म्हणालो, त्यानंतर चार-पाच दिवस झालेनंतर त्यांच्या वाड्यावर गेलो. त्यास आवाज  दिल्यावर तो घरी नसलेचे सांगितल्यामुळे मी त्यांच्या वडिलांना व भावांना सांगितले की, संग्रामने दोन बोकडे करीच्या वेळी नेहली आहेत. त्या पैशासाठी आलो होतो, असे सांगून तो घरी निघून आला होता. दोन दिवसानंतर कुरणातून शेळ्या घेऊन येत असताना गांवच्या पाणंदीत मला आडवून संग्राम दमदाटी करू लागला व शिव्यागाळ करीत म्हणाला, वाड्यावर जाऊन माझ्या वडिलांना व भावांना पैसे मागतोय काय ?  असे म्हणून मला मारहाण करू लागला. त्यामुळे शेळ्या भेदरून घराच्या रस्त्याने पळू लागल्या. त्यावर  संग्रामला मी म्हणालो की, माझे पैसे देण्याचे सोडून मलाच मारतोय का ? त्यावर संग्राम म्हणाला, पैसे मागायची तुझी हिमंतच कशी झाली ? तुला आता जिवंत सोडत नाही ? काय करायचे ते कर असे म्हणून लाथा -बुक्क्याने रागाने मारून म्हणू लागला की, तुझ्या शेळ्या कापून गावाला मटणाचे वाटे घालीन ?  त्यामुळे त्याचे बोल व मार असह्य झालेमुळे मी हातातील कुऱ्हाडीने त्याच्या  हातावर व पायावर कुऱ्हाड  हाणल्यामुळे तो जमिनीवरच कोसळला, त्यानंतर त्याचा  जोडीदार मोठा दगड उचलून माझ्या अंगावर आल्यावर त्याच्या हातावर कुऱ्हाड मारल्यामुळे  त्याच्याच हातातील दगड त्याच्या डोक्यात पडला होता, त्यामुळे त्याचे डोके फुटलेले होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या माणसांनी हे भांडण थांबविले. त्यामुळे मी घरी निघून आलो. शेळ्यांना  पाणी पाजले. त्यानंतर रक्ताने कुऱ्हाड माखलेली  होती ती पाण्याने धुवून घेतली. अंगावरचे रक्ताचे कपडे बदलले, बराच वेळ शेळ्या जवळच बसून होतो. त्यावेळेस पोलीस येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन आले, ही खरी हकीगत आहे.

त्यानंतर दगडू, अनुसया, मरगूबाई, मालतीच्या  चेहऱ्यावर उदासी दाटून आली. मरगूबाई खंडूस म्हणाली, दादा तू काय घाबरू नकोस ? मी कोर्टात तुझ्या केस साठी चांगला वकील देईन ?  त्यातून नक्कीच चांगला मार्ग निघेल असे म्हणून मरगूबाई पोलीस फौजदार  साहेबांना तिने वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर फौजदार साहेब म्हणाले, थोड्या दिवसानंतर चार्टशिट तयार करून कोर्टात पाठवितो ? तुम्ही वकील द्या असे म्हटल्यानंतर मरगूबाईने  सर्वांना घेऊन घरी आली. खंडूच्या कैदी मुळे सर्व कुटुंबावर आभाळ कोसळल्या  सारखे झालेले होते.
मरगूबाईंने खंडूची कोर्टातील केस लढविणेसाठी चांगला वकील दिला होता. कोर्टात तारखा पडत होत्या. कोर्टाच्या तारखे दिवशी मरगूबाई,दगडू, अनुसया, मालती दिवसभर कोर्टात बसून असत. कोर्टात खंडूला पाहिल्या नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहत असत. कोर्टाच्या तारखे दिवशी खंडूस पाहता- बोलता येत असल्याचे समाधान त्यांना वाटत असे. संग्राम सुद्धा काठीचा आधार घेऊन लंगडत कोर्टात येत असे. त्यांनी खंडूच्या विरोधात कोर्टात साक्षीदार उभे केले होते. संग्रामने खंडूचे साक्षीदार फोडलेले होते. त्यांनी खंडूच्या विरोधात कोर्टात साक्षी दिली असलेमुळे खंडूच्या विरोधात निकाल लागलेला असलेमुळे  खंडूस सजा झाली. तो जेल मध्ये गेला. त्यामुळे मरगूबाईची धडपड वाया गेली. दगडू, अनुसया, मालतीच्या मनावर त्याचा फार मोठा आघात झाल्यामुळे दगडूस नैराश्य आले मुळे दारूच्या आहारी गेला. अनुसयाला काय समजेना,आपल्याच घराचे असे विपरीत  कसे काय झाले ? पोटचा गोळा जेलात गेला. नवरा दारू पिऊन कुठेही पडू लागला. त्यामुळे ती हतबल होऊ लागली होती. मालती तर आपल्या अंगावर वीज कोसळल्या सारखे वाटू लागले होते. त्यामुळे तिला काय करावे काय समजेना, कारण ती पोटूशी असलेमुळे अस्वस्थ झालेली होती. परंतु मरगूबाईने घरातील सर्वांना धीर व आधार दिला होता. हे दिवस असेच राहणार नाहीत. काळजी करू नका, असे वारंवार सांगत होती. त्यानंतर तिने मालतीस बाळंतपणासाठी माहेरी नेऊन सोडून आलेली होती.

काही दिवसानंतर मरगुबाईचे लग्न शेजारच्या गावातील भास्कर बरोबर करणेत आलेले होते. भास्कर हा मुंबईत राहून आलेला असलेमुळे समंजसपणे  वागत होता. त्यामुळे दोघांचाही संसार व्यवस्थित सुरू होता. भास्कर लग्नानंतर काही दिवस मरगूबाई बरोबर चांगला वागत होता, परंतु मरगूबाई आपल्या आई-वडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेत असलेमुळे पगार झाल्यावर आई- वडिलांना व मालतीस मनी ऑर्डर ने पैसे पाठवित असलेमुळे व आई-वडिलांकडे व मालतीकडे जाणे-येणे असलेमुळे भास्करला हे पसंत पडत नव्हते. त्यामुळे दोघांत वाद होऊ लागले होते. परंतु मरगूबाई दुर्लक्ष करीत असे. त्यामुळे भास्कर हा मरगूबाईस जास्तच त्रास देत असे. भास्करला वाटत होते की, मरगूबाईने सर्व पगार आपल्याच हातात आणून दिला पाहिजे. त्यावर मरगूबाई भास्करला  समजावून सांगत असे की, माझ्या आई- वडिलांनी मला लहानाचे मोठे केले आहे. त्यांनी काबाडकष्ट करून अत्यंत गरीब परिस्थितीतून मला शिकविले आहे. माझ्यासाठी हाल अपेष्ठा सहन करून शिक्षणासाठी त्यांनी पैशाची तरतूद केलेमुळे मी शिक्षिका झाली.त्यामुळे त्यांचा सुद्धा अधिकार आहे. त्यावर भास्कर म्हणाला, मग माझे बरोबर लग्न कशाला केले आहेस ? त्यावर मरगूबाई म्हणाली, माझ्या पगारातील थोडी बहुत रक्कम त्यांना देते. कारण आई-वडील आता वयस्कर झालेले आहेत. मालती बाळंतपणासाठी आता माहेरी आहे. खंडू जेलमध्ये आहे. बाकीचे पैसे तुमच्याकडेच देते ना ?  त्यामुळे घरात  वाद होत असत. परंतु मरगूबाई सर्वांनाच सांभाळून घेत असलेमुळे भास्कर शांत राहत असे.
एके दिवशी मरगूबाईनी भास्करला सांगितले की, मला दिवस गेले आहेत, आपण दोघेही जाऊन माझ्या आई-वडिलांना भेटून येऊया व त्यांना ही गोड बातमी सांगू या ? त्यावर भास्कर रागाने घरात निघून जात असे. त्यानंतर चार-पाच महिन्यानंतर एके दिवशी भास्कर मरगूबाईस दवाखान्यात घेऊन जाणे साठी तयार झाला. त्याने मोटार सायकल वरून दवाखान्यात तपासण्यासाठी घेऊन जात असताना, रस्त्याच्या खड्ड्या मधून गाडी गेल्यावर मरगुबाईस तोल संभाळता न आल्याने मोटार सायकलवरून घसरून पोटावर पडल्यामुळे तिला अनेक वेदना झाल्यामुळे दवाखान्यात अॅडमिट करणेत आले. डॉक्टरने ऑपरेशन करून मरगूबाई जीवदान दिले. परंतु ती मातृत्वाच्या सुखापासून कायमचीच वंचित राहावे लागले. त्यामुळे अनुसयाने व दगडूने मरगूबाईचा जीव वाचला म्हणून पंढरीच्या पांडूरंगाचे मनोमन आभार मानले.

त्यानंतर भास्कर भीती  पोटी मुंबईस जाऊन राहू लागला. काही दिवसांनी त्याने दुसरे लग्न मुंबईत केले होते. मरगूबाईने अनेक वेळा भास्करला विनंत्या करूनही तो गावी येण्यास तयार होईना. त्यामुळे नाईलाजास्तव मरगूबाईने आपल्या नोकरीच्या गांवी आपले आई-वडील, भावजय मालती,भाचा महेश यांना घेवून आलेली होती. तिने महेश चे नाव आपल्या शाळेत घातलेले होते.

दिवसा मागून दिवस निघून गेले. खंडूची जेल मधून सुटण्याची तारीख कळल्यानंतर मरगूबाईने आपल्या आई- वडील तसेच मालती, महेश यांना घेऊन सदर कारागृहाच्या बाहेर खंडूची वाट पाहत होती. परंतु अनेक तास उलटून गेले तरी खंडू जेलच्या बाहेर येईना, म्हणून गेटवरचे जेलच्या पोलिसांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की,  तुम्ही अनेक तासापासून इथे उभे आहात, मी आतून माहिती घेऊन येतो असे म्हणून जेलच्या आत गेले. थोड्या वेळानंतर बाहेर येऊन त्यांनी सांगितले की, खंडू नावाचा इसम मागील दोन महिन्यापूर्वीच चांगल्या वर्तनुकीमुळे सुटून बाहेर गेलेला आहे ? तो कुठे गेला आहे हे आम्हास माहित नाही, असे सांगितल्यावर सर्वांनाच धक्का बसला. काळजीने सर्वांचेच चेहरे पडले. उदास मनाने घराचा रस्ता धरला. सर्वांच्याच मनास अत्यंत वेदना झालेल्या होत्या, संकटातील दु:ख काय असते याची जाणीव झाली होती. परंतु मरगूबाईने हार मानली नाही. तिने सर्वांना समजून सांगून आधार दिला. घरातील सर्वांना घेऊन हिमतीने व धाडसाने जीवन क्रम चालवू लागली होती. आणि आता महेश ला शिकवून मोठा अधिकारी करण्याची जिद्द ठरवून पुढील मार्गाला लागली होती.

आयु, विलास खरात,आटपाडी
मो.नं.९२८४०७३२७७ 


Back to top button
Don`t copy text!