सुरवडी सबस्टेशन अंतर्गत सक्तीच्या भारनियमनामुळे नागरिक हैराण; महावितरणच्या विरोधात रास्ता रोकोचा इशारा


साखरवाडी, निंभोरे, वाठार परिसरातील शेतकरी व पशुपालक संतप्त; रात्रीच्या वीजकपातीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले

स्थैर्य, फलटण, दि. ५ जून : फलटण तालुक्यातील सुरवडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरवाडी, निंभोरे व वाठार शेती फिडरवर गेल्या महिनाभरापासून सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सक्तीचे भारनियमन सुरू आहे. यामुळे शेतकरी, पशुपालक व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमित वीजबिल भरूनही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, तातडीने उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

पशुपालक व दुग्ध व्यावसायिकांना मोठा फटका

या कृषी फिडरवरील बहुतांश भाग हा रानातील वाड्या-वस्त्यांचा असून, येथील नागरिक शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय व पशुपालनावर अवलंबून आहेत. सायंकाळच्या वेळेत जनावरांना पाणी पाजणे, वैरण टाकणे, कुट्टी मशीन चालवणे आणि दूध काढण्याच्या मशिन्स वापरणे यासाठी विजेची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, नेमक्या याच वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्री वीज येताच पुन्हा गायब

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले सायंकाळचे चार तासांचे भारनियमन शेतकऱ्यांनी संयमाने सहन केले. मात्र, मागील आठ दिवसांपासून रात्री १० वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत पुन्हा वीज खंडित केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर पुन्हा तीन ते चार तासांनी वीज येते. महावितरणच्या या लपंडावामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे.

नियमित वीजबिल भरूनही अन्याय का?

याबाबत सुरवडी सबस्टेशनशी संपर्क साधून विचारणा केली असता, “वरिष्ठ स्तरावरून सक्तीचे भारनियमन सुरू असून त्यानुसारच वीजपुरवठा नियंत्रित केला जात आहे,” असे उत्तर महावितरणकडून दिले जात आहे. मात्र, “आम्ही नियमितपणे वीजबिल भरतो. एक महिना थकबाकी झाली तरी महावितरण तत्परतेने वीजपुरवठा खंडित करते. मग वाड्या-वस्त्यांवरील ग्राहकांनाच सतत भारनियमनाचा फटका का सहन करावा लागतो?” असा संतप्त सवाल शेतकरी व पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे.

चोऱ्यांचे प्रमाण वाढले; रास्ता रोकोचा इशारा

“मागील महिन्यापासून आमच्याकडे सायंकाळी ६ ते १० रोज भारनियमन चालू आहे. मात्र, आठ दिवसांपासून रात्री दहा वाजता विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांत पुन्हा बंद होऊन तीन-चार तासांनी सुरू होत आहे. अंधारामुळे या भागात चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना व्हावी, अन्यथा आम्ही रास्ता रोको करणार आहोत.” > – बाळासो जगताप (माजी उपसरपंच, सुरवडी)

सध्या सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, महावितरणने भारनियमनाचा तातडीने फेरविचार करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, फलटण येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!