
फलटणमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची तब्बल ४२ लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 24 जुलै : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फलटण शहरातील एका ज्वेलर्स व्यावसायिकाची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. मनिष गांधी (वय २५, रा. रविवार पेठ, फलटण) यांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी मनिष गांधी यांच्याशी फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी गांधी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी विविध ट्रेडिंग अकाउंट आणि बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.
गांधी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि यूपीआयद्वारे (UPI) एकूण ४२ लाख रुपये पाठवले. ट्रेडिंग अकाउंटमध्ये नफा झाल्याचे भासवून संशयितांनी आणखी पैशांची मागणी केली. मात्र, गांधी यांनी रक्कम परत मागितल्यावर ती देण्यास नकार दिला आणि मार्जिन भरण्याच्या नावाखाली पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या फसवणुकीप्रकरणी पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून ऑनलाइन गुंतवणूक करू नये तसेच ओटीपी, पिन, पासवर्ड, आधार कार्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
