ध्येयाप्रती निष्ठा आणि कठोर परिश्रम यामागेच यश : प्रदीप गोरड

मुधोजी महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षांमधून पोलीस अधिकारी होण्याचा प्रवास : नियोजन, तयारी आणि यश’ या विषयावर मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | फलटण |
यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयाशी निष्ठा, त्याग, सातत्य आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही, असे प्रेरणादायी विचार व्यक्त करून अपयश हे यशाची पहिली पायरी असून त्यातून शिकत पुढे जाणे यामागेच खरे यशाचे गमक असल्याचे पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त प्रदीप गोरड यांनी म्हटले आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांमधून पोलीस अधिकारी होण्याचा प्रवास : नियोजन, तयारी आणि यश” या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप गोरड बोलत होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि यशाचा मार्ग मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम हे होते. समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे व प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गिरीष पवार यांनी केले. त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असे सांगितले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.

प्रदीप गोरड यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रेरणादायी संवाद साधत स्पर्धा परीक्षेतील यशासाठी आवश्यक असलेले नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि शिस्त यांचे महत्त्व विशद केले. अधिकारी होण्याच्या प्रवासातील स्वतःचे अनुभव सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

स्पर्धा परीक्षेची तयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नियमित वर्तमानपत्र वाचन, संदर्भग्रंथांचा अभ्यास, चालू घडामोडींचे ज्ञान, उत्तरलेखनाचा सराव, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलाखतीची तयारी यांसारख्या विविध पैलूंवर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमधील विविध संधी, पोलीस सेवेतील करिअर आणि प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमात उपस्थित कु. प्राजक्ता लक्ष्मण शिंदे (महसूल सहाय्यक) हिने मनोगत व्यक्त करत “प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवता येते,’ असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे फायदेही तिने स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळविण्याचा मार्ग नसून समाजसेवेची आणि नेतृत्व घडविण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबतच्या विविध शंका मांडल्या. अभ्यासाचे नियोजन, पुस्तकांची निवड, वेळेचे व्यवस्थापन, शारीरिक चाचणी, मुलाखत आणि करिअरच्या विविध संधी यासंदर्भातील प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी सविस्तर उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले.

सूत्रसंचालन कु. पायल जाधव व कु. शिवाजंली रणदिवे यांनी केले. तर कु. श्रुतिका कदम हिने उपस्थित मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शाखांतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!