
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. १६ सप्टेंबर : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर साठ्यातील (Buffer Stock) कांदा थेट बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या हस्तक्षेपामुळे घाऊक बाजारातील कांद्याच्या दरात सुमारे ९ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली आहे. नॅशनल कॉपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन (NCCF) आणि नाफेडच्या (NAFED) माध्यमातून विविध शहरांमध्ये ३५ रुपये प्रति किलो दराने कांद्याची सवलतीच्या दरात विक्री सुरू करण्यात आली आहे.
बफर साठ्यामुळे दरावर नियंत्रण
कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने विशेष कांदा एक्स्प्रेस गाड्या आणि रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून प्रमुख शहरांमध्ये कांद्याची उपलब्धता वाढवली आहे. देशांतर्गत बाजारात सुमारे ९,२०० मीट्रिक टनांपेक्षा जास्त कांदा पाठवण्यात आला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर कमी झाले असून, आगामी १ ते २ आठवड्यांत किरकोळ बाजारातही कांदा प्रति किलो ५ ते १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता अन् व्यापाऱ्यांची सावध भूमिका
एकीकडे कांदा स्वस्त होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बाजारात अचानक बफर स्टॉकचा कांदा आल्यामुळे लिलावातील दर घसरले आहेत. नवीन खरीप हंगामातील कांद्याची आवक ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणार असून, त्याआधीच दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.