बॅडमिंटन स्पर्धेत फलटणच्या कृषी महाविद्यालयाला अजिंक्यपद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत आयोजित शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेनिस स्पर्धा दि. ३० ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये कृषि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २१ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला.

अत्यंत चुरशीच्या व रोमांचक झालेल्या महिला बॅडमिंटन स्पर्धेत कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध कामगिरी आणि जिद्दीच्या बळावर सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अजिंक्यपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. विजेत्या संघामध्ये कु. मृण्मयी हिंगणे, कु. गौरी पवार, कु. श्यामली भोसले, कु. भावना राजपूत आणि कु. रोहिणी मिसाळ या विद्यार्थिनींचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे प्रभावी प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात डॉ. जे. बी. गुरव, शैक्षणिक संचालक, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेरचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, डॉ. अभिजीत नलवडे, क्रीडा अधिकारी, कृषि महाविद्यालय, पुणे, प्रा. सीताराम वरखड, कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी यांच्या हस्ते विजेत्या संघास चषक व पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे कृषि महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी व प्रशिक्षक प्रा. नवनाथ खुरंगे आणि प्रा. रोशन सोडमिसे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजनबद्ध सराव आणि मेहनत मोलाची ठरली. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाला विद्यापीठ स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले.

या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद, साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी विजयी संघाचे व क्रीडा अधिकार्‍यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Back to top button
Don`t copy text!