
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | फलटण |
कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शेतकर्यांनी देशाबाहेर अभ्यास दौर्यांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकर्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकर्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकर्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२६-२७ ही योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मुक्त पत्रकार, लेखक, कवी,साहित्यिक आणि सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना अनिलकुमार कदम म्हणाले की,”शेतक-यांनी देशाबाहेरील अभ्यास दौर्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावेत, तसेच शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्याwww.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळला भेट द्यावी.
महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने अर्ज वेळेत दाखल करावेत व शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.