
थेट WhatsApp वर मिळवा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या गहू आणि तांदळामध्ये सोंड कीड आढळल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १६ सप्टेंबर : राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा दर्जा खालावल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यापासून अनेक भागांतील रास्त भाव दुकानांमध्ये सोंडकीड लागलेला आणि बुरशीयुक्त गहू व तांदूळ पुरवला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खाण्यायोग्य नसलेले धान्य वितरित केले जात असल्याने शिधापत्रिकाधारकांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
धान्याच्या दर्जावर नागरिकांचा तीव्र संताप
अनेक जिल्ह्यांमधील रेशन दुकानांमधून वितरित करण्यात आलेल्या गव्हामध्ये कीड आणि उंदरांच्या लेंड्या, तर तांदळात मोठ्या प्रमाणावर चुरी व बुरशी आढळून येत आहे. हे धान्य स्वच्छ करूनही वापरण्यायोग्य राहत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. गोरगरीब कुटुंबांना सणासुदीच्या काळात हेच धान्य विकत घ्यावे लागत असून, आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुकानदार आणि प्रशासनाकडून कारवाईची मागणी
रेशन दुकानदारांनीही या निकृष्ट पुरवठ्याबाबत असमर्थता दर्शवली असून, गोदामांतूनच हलक्या दर्जाचे धान्य पाठवले जात असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, खराब धान्याचा साठा बदलावा आणि संबंधित पुरवठादारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिधापत्रिकाधारक व ग्राहक संघटनांकडून जोर धरत आहे.