आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक; २९ सप्टेंबरला मुंबईत निघणार महामोर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाने २९ सप्टेंबर रोजी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान निर्धार महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १६ सप्टेंबर : अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे या मागणीसाठी सकal मातंग समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा भव्य निर्धार महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित मातंग समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत या आंदोलनाची अधिकृत रूपरेषा निश्चित करण्यात आली.

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारवर अक्षम्य दिरंगाईचा आरोप

न्यायमूर्ती बदर समितीने उपवर्गीकरणाबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला असून त्यावर ‘बार्टी’कडे सुमारे एक लाख हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असली, तरी शासन या विषयावर वेळकाढूपणा करत असल्याचा संताप बैठकीत व्यक्त करण्यात आला. २५ सप्टेंबरपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास मुंबईत निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा समाजाने दिला आहे.

हरियाणा आणि तेलंगणाच्या धर्तीवर अंमलबजावणीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषांवर अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना मिळाला आहे. त्यानुसार हरियाणा, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी आधीच उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातही ५९ अनुसूचित जातींपैकी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी उपवर्गीकरण लागू करावे, या मागणीसाठी राज्यभरात आतापर्यंत ७१ मोर्चे काढण्यात आले आहेत.

 

 

Back to top button
Don`t copy text!