

आगामी पावसाळा आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. सर्व विभागांना २० मे पर्यंत आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करण्याचे आणि १ जूनपासून २४x७ नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ६ मे : आगामी पावसाळा आणि हवामान खात्याने यंदा वर्तवलेला कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला अद्ययावत आराखडा २० मे २०२६ पर्यंत सादर करावा. तसेच, या अनुषंगाने संभाव्य टंचाईचा आराखडाही तयार ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले.
पाणी पुरवठा आणि सिंचन विभागाने त्यांच्या पाण्याच्या स्त्रोतांचे तात्काळ ‘मॅपिंग’ करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, सिंचन मंडळ साताराचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
■ पूर्वतयारी व नियंत्रण कक्षाबाबत सूचना:
-
पूर्व बैठका: तालुका व गावपातळीवर १५ मे पूर्वी मान्सूनपूर्व तयारीच्या बैठका घेण्यात याव्यात.
-
नियंत्रण कक्ष: प्रत्येक विभागाने तात्काळ नोडल अधिकारी नियुक्त करून १ जूनपासून २४x७ (अहोरात्र) नियंत्रण कक्ष सुरू करावा.
-
बचाव साहित्य: शोध व बचाव साहित्याची (Search & Rescue Equipment) चाचणी २५ मे पूर्वी पूर्ण करावी.
-
संपर्क: कोणत्याही प्रकारच्या आपत्तीजन्य घटना घडल्यास तात्काळ जिल्हा व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
■ विभागनिहाय देण्यात आलेले महत्त्वाचे निर्देश:
-
महसूल व सार्वजनिक बांधकाम विभाग: धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करावे. पूरग्रस्त भागात अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवावा. नालेसफाई व पुलांच्या दुरुस्तीची कामे प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. घाट रस्त्यांसाठी विशेष नोडल अधिकारी नेमून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत; तसेच दरड कोसळल्यास ती तातडीने हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. पर्जन्यमापक यंत्रांची पाहणी करून दररोज पावसाची नोंद सादर करण्याची जबाबदारी निश्चित करावी.
-
आरोग्य विभाग: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना कराव्यात आणि रुग्णालये व रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) सेवा सज्ज ठेवावी.
-
पाटबंधारे विभाग: धरणनिहाय आपत्कालीन आराखडे तयार करून पाणीसाठा व विसर्गाचे योग्य नियोजन करावे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना वेळेवर पूर्वसूचना (इशारा) द्यावी.
-
विद्युत वितरण विभाग (महावितरण): अतिवृष्टीदरम्यान विजेचा धक्का लागून होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ठेवावी. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीची व यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत.
-
पुरवठा व शिक्षण विभाग: पुरवठा विभागाने दुर्गम आणि डोंगराळ भागात अन्नधान्य व गॅसचा पुरेसा साठा करून ठेवावा. शिक्षण विभागाने आवश्यकतेनुसार नागरिकांच्या स्थलांतरासाठी शाळा तयार ठेवाव्यात.
-
पशुसंवर्धन व पुनर्वसन: पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. पुनर्वसन आणि स्थलांतरासाठीचे शेड सुस्थितीत व स्वच्छ ठेवावेत. ज्या ठिकाणी नवीन स्थलांतर शेड उभारायचे आहेत, त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत.
संभाव्य पूरस्थिती व आपत्तींचा खंबीरपणे सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देत, मान्सूनपूर्व तयारी अधिक प्रभावी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सर्व विभागांना दिल्या.
