
पुणे पोलिसांनी बारामतीतून चोरलेल्या १९ दुचाकी फलटणच्या कोळकी येथून जप्त केल्या आहेत. ३० लाखांच्या मुद्देमालासह एका संशयिताला अटक केली असून १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत बारामती परिसरातून चोरलेल्या तब्बल १९ दुचाकी फलटणचे उपनगर असलेल्या कोळकी येथून जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
चोरीच्या वाहनांवर शासनाचे लोगो
मागील पंधरा दिवसांपासून बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुलेट चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवून बारामतीतील मेडिकल कॉलेज परिसरात सापळा रचला. यावेळी समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीच्या दुचाकीवर महाराष्ट्र पोलीस, वनसेवा आणि एसटी महामंडळाचे लोगो लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
कोळकीतून ३० लाखांची वाहने जप्त
संशयिताकडे अधिक चौकशी केली असता, त्याने चोरी केलेल्या गाड्या फलटणनजीकच्या कोळकी येथे ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कोळकी येथून १३ बुलेट आणि इतर ६ अशा एकूण १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशनमधील दुचाकी चोरीचे एकूण १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
