डोळ्यात चटणी टाकून दागिना लुटणारा विडणीत जेरबंद; चोरीचे धक्कादायक कारण उघड

विडणीत शेतातून घरी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यात चटणी फेकून सोन्याचा दागिना लुटणाऱ्या संशयिताला फलटण पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : विडणी (ता. फलटण) परिसरातील २४ फाटा येथे शेतातून घरी जाणाऱ्या एका महिलेच्या डोळ्यात चटणी फेकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या संशयिताला फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

केरळला फिरायला जाण्यासाठी केली चोरी

शेतातून काम संपवून घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत ऊसाच्या शेतातून आलेल्या संशयिताने निर्जन ठिकाणी डोळ्यात चटणी फेकून गळ्यातील दागिना लंपास केला होता. पोलिसांनी तातडीने दोन तपास पथके तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे विडणी येथून अथर्व ऊर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान केरळ येथे फिरायला जाण्यासाठी पैशांची गरज असल्याने ही चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली.

चार दिवसांची पोलीस कोठडी

न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार आणि त्यांच्या पथकाने केली.

Back to top button
Don`t copy text!