
स्थैर्य, सांगली, दि.२३: जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असला तरी सरासरी तो 22 टक्केपर्यंत आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी होणे आवश्यक असल्याने ५ मे पासून २६ मे पर्यंत सुरू असणाऱ्या कडक निर्बंधांबाबत 28 दिवसानंतर म्हणजे 14 – 14 दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येमध्ये किती फरक पडतो याची पुन्हा एकदा मिमांसा केली जाईल व पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ज्या गावांमध्ये ग्राम समित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी अत्यंत चांगली केली, तेथील रुग्ण संख्या कमी आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्वच ग्राम समित्यांनी अधिक सक्षमपणे, एकजिनसीपणे काम करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेने प्रतिबंधात्मक निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी दिले.
कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले- बर्डे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणातूनच या रुग्णांवर उपचार व्हावेत. तसेच या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती अधिक काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाईन वर्कशॉप घ्यावा, असे सूचित केले. याबरोबरच म्युकर मायकोसिसची पुढील काळात रुग्ण संख्या किती पर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देशित केले. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून कम्युनिटी आयसोलेशन अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांना ही आयसोलेशनमध्ये ठेवावे, असे यावेळी त्यांनी निर्देशित केले.
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी लॉकडाऊनच्या काळात रुग्ण संख्या वाढत आहे याचा यंत्रणेने अधिक गांभीर्याने कारणमीमांसा करणे आवश्यक आहे, असे सांगून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सांगली जिल्हा व शहरांमधील बाल रोग तज्ज्ञांची बैठक घ्यावी व अनुषंगिक तयारी ठेवावी, असे निर्देशित केले. यावेळी त्यांनी लॉकडाऊन निर्बंधांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरजही प्रतिपादित केली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात सध्या साडेसहा ते सात हजार टेस्टिंग होत आहे. तेराशे ते साडे तेराशे पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झालेली दिसून येत आहे . बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णही आपल्या जिल्ह्यात उपचारासाठी येत असून यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दररोज दहा ते बारा असे आहे, असे सांगितले.
या बैठकीत लोकप्रतिनिधींनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन यंत्रणेने सर्व सज्जता ठेवावी. म्युकर मायकोसिस आजारावरील पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. तसेच प्रतिबंधात्मक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करून कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करावा अशा सूचना केल्या.