फलटणमध्ये दुसऱ्या दिवशी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी


स्थैर्य, फलटण, दि. २६ : शासनाचे लावलेल्या निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. फलटणसह सातारा जिल्ह्यातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत. फलटण शहरामध्ये पोलीस, नगरपालिका व महसूल विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते सील केलेले आहेत. रस्त्यावर विनाकारण कोणी फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. फलटण शहरामधील प्रमुख चौकांसह छोट्या मोठ्या चौकात सुद्धा पोलीस, नगरपालिका व महसूल विभागाच्या वतीने पथक तयार करण्यात आलेली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले कडक निर्बंध मंगळवारपासून आणखीन कठोर करण्यात आले आहेत. फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पालिका अधीक्षक मुस्ताक महात, स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील नाकाबंदीची पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका व जिंती नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून चौकशी करण्यात येत होती. काही चौकांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांचा गाड्या जप्त केलेल्या आहेत. तसेच विनाकारण रस्त्यांवर फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येत होती. बँकिंग कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे आयकार्ड तपासणी करूनच पूर्णपणे खात्री झाल्यानंतरच त्यांना सोडले जात होते.

फलटण तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांपैकी एक, तीव्र लॉक डाऊन संकल्पनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २४ मे रोजी रात्री १२.०० ते दि. ०१ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत फलटण तालुक्यात तीव्र लॉक डाऊनचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. २४ मे २०२१ पासून पुढील ७ दिवस लॅाक डाऊनची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने करावयाची असल्याचे नमूद करीत या कालावधीत रस्त्यावर भाजी, फळे विक्रेते दिसणार नाहीत, दुकाने उघडी दिसणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत.
– डॉ. शिवाजी जगताप,
प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर,
फलटण

सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता दि. 24 मेच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आहेत. दि. 24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करण्यात आलेली आहे. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे व ह्या पुढे सुद्धा करण्यात येणार आहे.
– तानाजी बरडे,
पोलीस उपअधीक्षक,
फलटण

सध्या फलटण शहरामधील नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक लोकडाऊन बाबतचे आदेश पारित केलेले आहेत. फलटण शहरामध्ये सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत फक्त दूध विक्रेत्यांना घरपोच सेवा देण्याची परवानगी आहे. तरी कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. जे विनाकारण बाहेर फिरत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– संजय गायकवाड,
मुख्याधिकारी, फलटण नगर परिषद

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक लॉकडाऊनची आदेश पारित केलेले आहेत. त्या मुळे नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. जर कोणत्याही कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्कात आला असाल तर तातडीने आपण कोरोना चाचणी करून घ्यावी.
– डॉ. सौ. अमिता गावडे – पवार,
गटविकास अधिकारी,
फलटण पंचायत समिती


Back to top button
Don`t copy text!