
महाबळेश्वर जवळील अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाई येथील चव्हाण दाम्पत्य ३०० फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून महाबळेश्वर ट्रेकर्सने मृतदेह बाहेर काढले.
स्थैर्य, सातारा, दि. २४ : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याची गाडी दरीत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे.
नियंत्रण सुटल्याने ३०० फूट खोल दरीत कोसळले
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहन आणि राजश्री चव्हाण हे भंगार व्यावसायिक होते. गुरुवारी सायंकाळी ते पोलादपूरहून वाईकडे परत येत होते. त्यांच्या दुचाकीवर भंगार वस्तूंची गाठोडी होती. महाबळेश्वरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर प्रतापगड कमानीनजीक त्यांची दुचाकी आली असता, अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रेलिंगच्या मधील मोकळ्या जागेत धडकली. यावेळी दुचाकी रस्त्याकडेलाच अडकून राहिली, मात्र वेगामुळे चव्हाण दाम्पत्य थेट ३०० फूट खोल दरीत फेकले गेले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रीच्या काळोखात रेस्क्यू टीमचे मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ व ‘प्रतापगड रेस्क्यू टीम’ने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या काळोखात आणि अवघड भौगोलिक स्थितीत ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीत उतरून मदतकार्य सुरू केले व अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या शोध मोहिमेत नगरसेवक कुमार शिंदे, सुनील भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, अनिकेत वागदरे, मृणाल उत्तेकर, ऋषीकेश जाधव, आशिष विरामणे आणि जयवंत बिरामणे यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात दाम्पत्यांच्या अपघातांची मालिका
गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्यांच्या अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. नुकतेच पाटण तालुक्यात एका नवविवाहित दाम्पत्याचा लग्नानंतर अवघ्या १० दिवसांतच अपघातात करुण अंत झाला होता. तर राजुरी (ता. फलटण) येथे दुचाकीवरून एका विवाहाला जाणाऱ्या दाम्पत्यावरही काळाने असाच घाला घातला होता. त्यानंतर आता अंबेनळी घाटातील या दुर्घटनेमुळे जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

