फलटण एज्युकेशन सोसायटी व जिमखान्याच्या वतीने ‘उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरा’चे थाटात उद्घाटन; ४५० खेळाडूंचा सहभाग


फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती व फलटण जिमखान्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन. विविध खेळांचे धडे गिरवण्यासाठी ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग.

स्थैर्य, फलटण, दि. 24 एप्रिल : फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती आणि फलटण जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरा’चे शानदार उद्घाटन नुकतेच पार पडले. या शिबिरात फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळा, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांतील सुमारे ४५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

या शिबिराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबीर सोमवार, दि. २३ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान शहरातील विविध क्रीडांगणांवर पार पडणार आहे.

“फलटणची क्रीडा परंपरा अखंडित ठेवा” – श्रीमंत संजीवराजे

शिबिराचे उद्घाटन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “फलटणला खो-खो, हॉकी आणि फुटबॉल या खेळांची अत्यंत मोठी आणि गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अखंडित सुरू ठेवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक आणि खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवले, तर यातून उत्तम आणि दर्जेदार खेळाडू नक्की तयार होतील. फलटणमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नेहमीच केले जाते, त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा.”

क्रीडा प्रकार आणि सरावाची ठिकाणे:

  • श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल: खो-खो, हॉकी, कब्बडी.

  • श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (जाधववाडी): फुटबॉल, आर्चरी (धनुर्विद्या), कराटे.

  • मुधोजी महाविद्यालय: ॲथलेटिक्स.

एनआयएस (NIS) प्रशिक्षकांचे लाभणार मार्गदर्शन:

या शिबिरात एनआयएस (NIS) प्रशिक्षित आणि अनुभवी क्रीडा मार्गदर्शकांकडून खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे:

  • हॉकी: सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे, कु. धनश्री.

  • फुटबॉल: संजय फडतरे, अमित काळे, अमोल नाळे, उत्तमराव घोरपडे, संकेत मठपती.

  • खो-खो: शिवाजी बनकर, अविनाश गंगतीरे, सौ. गावडे, सौ. मुलाणी.

  • आर्चरी व कराटे: सुरज ढेंबरे.

  • कब्बडी: तुषार मोहिते.

  • ॲथलेटिक्स: राज जाधव, प्रा. तायाप्पा शेंडगे.

शिबिराची वैशिष्ट्ये व फायदे:

शिबिरार्थी खेळाडूंना या काळात केवळ खेळाचे कौशल्यच नव्हे, तर त्यांची शारीरिक क्षमता, योगाभ्यास, समतोल आहार यावरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. योग्य आहार आणि व्यायामामुळे मानसिक ताण कसा कमी होतो आणि आरोग्य कसे सुधारते, याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच, सहभागी खेळाडूंना सरावानंतर दररोज सकाळी अल्पोपहार दिला जाणार असून, शिबीर पूर्ण केल्यानंतर सर्वांना ‘सहभाग प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सदस्य महादेवराव माने, ज्येष्ठ सदस्य संजय फडतरे, मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. पी. एच. कदम, प्राचार्य वसंतराव शेडगे, डॉ. सागर निंबाळकर, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, महेश निंबाळकर यांच्यासह सर्व क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन धुमाळ यांनी केले, सूत्रसंचालन तायप्पा शेंडगे यांनी केले, तर आभार तुषार मोहिते यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!