
अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळ्या बिबट्याचे (Black Panther) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दर्शन झाले आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात या दुर्मिळ वन्यजीवाची नोंद झाली असून, सह्याद्रीची जैवविविधता आणि समृद्धी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २४ : अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळ्या बिबट्याचे (Black Panther) दर्शन तसे दुरापास्तच असते. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एका ट्रॅप कॅमेऱ्याने नुकतीच या दुर्मिळ बिबट्याच्या अस्तित्वाची नोंद घेतली आहे. सहजासहजी न दिसणाऱ्या या काळ्या बिबट्यांची संख्या सह्याद्री पर्वतरांगांमधील घनदाट जंगलांत वाढत असल्याचा हा भक्कम पुरावा असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे.
‘काळा बिबट्या’ ही वेगळी प्रजाती नाही!
‘काळा बिबट्या’ ही कोणतीही वेगळी प्रजाती असल्याचा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, तो एक साधासुधा बिबट्याच आहे. जनुकीय बदलामुळे (Melanism) आणि त्वचेवर अतिप्रमाणात असलेल्या काळ्या रंगद्रव्यामुळे (मेलेनिन) त्याचा रंग काळा दिसतो. बिबट्याची एक मादी एकाच वेळी एका पिवळ्या आणि एका काळ्या बिबट्याला जन्म देऊ शकते, असे अभ्यासक सांगतात.
या काळ्या बिबट्याचा फोटो जवळून ‘झूम’ करून पाहिल्यास, त्याच्याही अंगावर पिवळ्या बिबट्यासारखीच ‘फुलाफुलांची नक्षी’ (Rosettes) असल्याचे स्पष्ट दिसून येते. मात्र, गडद रंगात हे छद्मावरण जवळून पाहिल्याखेरीज लक्षात येत नाही.
पश्चिम घाटात ‘छद्मावरणा’चा मोठा फायदा
पश्चिम घाटातील तिलारी, राधानगरी आणि रत्नागिरी परिसरात या काळ्या बिबट्याच्या अस्तित्वाच्या अनेक नोंदी यापूर्वी आढळल्या आहेत. जास्त पर्जन्यमान असलेल्या आणि घनदाट प्रदेशात त्याचा हा गडद काळा रंग त्याला उत्तम छद्मावरण (Camouflage) प्रदान करतो. अधिवासाच्या पार्श्वभूमीशी मिळतीजुळती अंगावरील नक्षी त्याला लपून राहण्यास आणि सावजाला गाफील ठेवण्यास अत्यंत उपयुक्त ठरते.
भ्रमणमार्गातील मानवी हस्तक्षेप आणि अपघात
साताऱ्याजवळ महामार्ग ओलांडताना दोन विविध घटनांमध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेने दोन बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यापैकी एक ‘काळा बिबट्या’ होता. बिबट्यांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग ठरलेला असतो आणि ते पिढ्यानपिढ्या त्याच मार्गावरून भ्रमंती करतात. मात्र, महामार्ग रुंदीकरणामुळे त्यांच्या या नैसर्गिक मार्गात अडथळा निर्माण झाल्याचे या दुर्घटनेवरून समोर आले होते.
सह्याद्रीची नैसर्गिक समृद्धी सुखावणारी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवन अत्यंत समृद्ध असून, अनेक लुप्तप्राय वनस्पती, पक्षी, उभयचर आणि सस्तन प्राणी येथे मोठ्या संख्येने आढळतात. त्यातच काळ्या बिबट्यासारखा ‘दुर्मिळ वन्यजीव’ या परिसरात वारंवार आढळणे, हा या परिसराच्या नैसर्गिक समृद्धीचा अत्यंत सुखावह पुरावा मानला जात आहे.
