
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारी प्रवाशांसाठी ‘NCMC स्मार्ट कार्ड’ प्रणाली लागू केली आहे. साताऱ्यात यासाठी नोंदणी सुरू झाली असून, कार्डचे अधिकृत शुल्क १९९ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या सवलतधारी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. एसटी महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रवासी सवलतींसाठी पूर्वी हस्तलिखित पास दिले जात होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून, प्रवाशांसाठी नवीन ‘NCMC’ (National Common Mobility Card) सवलत स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे.
नवीन नियमानुसार, सवलतधारी प्रवाशांसाठी आता वार्षिक किलोमीटर मर्यादा आणि प्रति प्रवास किलोमीटर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू
एसटी महामंडळाने ‘मे. ईबिक्स टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ आणि ‘एनएसडीएल (NSDL) पेमेंट बँक’ यांच्या सहकार्याने या नवीन स्मार्ट कार्डचे वितरण सुरू केले आहे. सातारा विभागातील बसस्थानकांसह विविध ठिकाणी कंपनीकडून नेमण्यात आलेल्या खाजगी एजंटांमार्फत ही नोंदणी प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे.
कार्डसाठी केवळ १९९ रुपये शुल्क
नवीन NCMC सवलत कार्ड नोंदणीसाठी प्रशासनाकडून १९९ रुपये इतके अधिकृत शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये संपूर्ण प्रकल्प कालावधीतील कार्डची देखभाल व इतर अनुषंगिक खर्चांचा समावेश आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आणि तक्रार निवारण
एसटी महामंडळाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, निश्चित केलेल्या १९९ रुपयांच्या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम एजंटांना देऊ नये. जर काही एजंटांकडून जास्त शुल्क आकारले जात असेल, तर प्रवाशांनी तात्काळ खालील क्रमांकांवर तक्रार नोंदवावी.
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक:
-
श्री. सर्वेश घाडगे – ८००७८६१५१९ (8007861519)
-
श्री. विकास चव्हाण (विभागीय प्रतिनिधी) – ७७३८०८७१२३ (7738087123)
