
दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२६ | फलटण |
विडणी येथे गेल्या काही महिन्यांपासून रोज सायंकाळी होत असलेल्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून हे भारनियमन बंद करावे. यासंदर्भात विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महावितरण अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
विडणी येथे रोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेल्या भारनियमनामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे उत्तरेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी संबंधित खात्याच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत महावितरण कार्यालयात संबंधित खात्याच्या अधिकार्यांना याविषयी लेखी निवेदन दिले.
यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे.
