‘लाडकी बहीण’ला पडताळणी नाही, मग एसटी प्रवाशांनाच अट का?; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेत बिनदिक्कत निधी वाटप आणि एसटीच्या सवलतीसाठी कार्डची जाचक अट, या सरकारच्या दुटप्पी धोरणावर जयंत पाटलांनी टीका केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ सप्टेंबर : एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलतीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य केल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थ्यांची कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता हजारो कोटींचा निधी वाटला जात असताना, प्रत्यक्ष बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांवरच कार्डची जाचक अट का, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एनसीएमसी कार्ड सक्ती रद्द करण्याची मागणी

जयंत पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र पाठवून एनसीएमसी कार्डची सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात पुरेशा पूर्वतयारीशिवाय ही योजना लादल्याने सर्व्हर डाऊन, कार्डचा तुटवडा आणि ऑनलाईन रिचार्जमधील त्रुटींमुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. एनसीएमसी कार्ड नसल्यामुळे अनेक प्रवाशांना हक्काची सवलत नाकारली जाऊन पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत.

शासकीय सवलती पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचे आवाहन

प्रशासनाने दिलेली तात्पुरती मुदतवाढ ही केवळ मलमपट्टी असून, मूळ तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय प्रवाशांचा प्रश्न सुटणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ही हास्यास्पद कार्ड सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. प्रवाशांना कोणताही तांत्रिक अडथळा न आणता पूर्वीप्रमाणेच ओळखपत्राच्या आधारे सवलतीचा लाभ सुरू ठेवावा, असा इशाराही पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!